
सोलापुरात आढावा बैठकीला अधिकारी उशिरा; उदय सामंतांनी जिल्हाधिकारी, एसपींची केली कानउघाडणी
नामदार उदय सामंत यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; “वेळेचे महत्त्व ओळखा, प्रोटोकॉल पाळा!”
सोलापुरातील आढावा बैठकीसाठी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक वेळेत उपस्थित न राहिल्याने उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांची बंद खोलीत कानउघाडणी केल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर उद्योग विभागाशी संबंधित विषयांच्या आढावा बैठकीसाठी नामदार उदय सामंत यांनी आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमात बदल करून वेळ दिली होती. मात्र बैठक संपल्यानंतरही जवळपास अर्धा तास जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक उपस्थित न झाल्याने त्यांनी संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.
*”आणखी दहा मिनिटांत बैठकीला उपस्थित राहा, अन्यथा मीच शिवसैनिकांसह तुमच्या कार्यालयात येईन,” अशा शब्दांत नामदार उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोन्ही वरिष्ठ अधिकारी तातडीने शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर सुमारे अर्धा तास बंद खोलीत चर्चा झाली. या चर्चेत प्रोटोकॉलचे पालन, बैठकीला झालेला विलंब आणि मंत्र्यांना प्रतीक्षा करावी लागल्याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
या घटनेतून एक स्पष्ट संदेश समोर येतो—वेळेचा आदर हीच खरी शिस्त आहे. पद कितीही मोठे असले तरी वेळेचे पालन आणि प्रोटोकॉलचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रशासनातील प्रत्येक अधिकाऱ्याने वेळेचे महत्त्व ओळखून शिस्तबद्ध कार्यपद्धती स्वीकारणे ही काळाची गरज आहे.




