
लोटेतील कंपन्यांचे सांडपाणी बोअरद्वारे भूगर्भात
पावसाळ्यात अती वृष्टीचा फायदा घेत नाल्यातून प्रदूषित सांडपाणी सोडण्याचा प्रकार, पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन आणि त्याचा शेतकरी, मच्छीमार व सर्वसामान्य नागरिकांवर होणारा परिणाम यांच्यासह यापूर्वीच्या मागण्यांवरील कार्यवाही आदी विविध विषयांसदर्भात शुक्रवारी शुक्रवारी विविध पर्यावरण तसेच सामाजिक संघटना प्रतिनिधींनी येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांच्यासमोर बैठक झाली. यावेळी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी लोटे एमआयडीसीतील प्रदूषणाबाबत अनेक गंभीर मुद्दे मांडले. त्यामध्ये काही उद्योगांकडून बोअरवेल खोदून त्यामार्फत रासायनिक सांडपाणी थेट जमिनीत मुरवले जात असल्याचा आरोप या बैठकीत सर्वाधिक चर्चेत राहिला.
या प्रकरणी उपप्रादेशिक अधिकारी कुलकर्णी यांनी, बोअरवेल खोदून सांडपाणी सोडणारी नेमकी कंपनी किंवा ठिकाणाची माहिती द्या, आम्ही तत्काळ कारवाई करू, असे सांगितले. मात्र पदाधिकार्यार्यांनी आम्हाला संबंधित ठिकाणांची माहिती आहे. या प्रकाराची केवळ कागदोपत्री चौकशी न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन तपासणी करावी आणि त्यासाठी सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधीनाही सोबत घ्यावे, आम्ही तुमच्यासोबत प्रत्यक्ष तपासणीसाठी येण्यास तयार आहोत, अशी भूमिका घेत अधिकार्यांना थेट संयुक्त पाहणीचे आव्हान दिले.




