आपल्याकडे सत्ता आहे आणि मी बोलेन तेच होईल, या भ्रमात राहिल्यास ‘गोकुळ’सारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही उद्योग मंत्री उदय सामंत यांचा इशारा


विधानपरिषद निवडणुकीतील शिक्षक मतदारसंघातील लढत ही केवळ ‘मैत्रीपूर्ण’ आहे. त्यामुळे महायुतीतील नेत्यांनी एकमेकांची मने दुखावणारी वक्तव्ये करणे टाळावे. “आपल्याकडे सत्ता आहे आणि मी बोलेन तेच होईल, या भ्रमात राहिल्यास ‘गोकुळ’सारखी परिस्थिती निर्माण व्हायला वेळ लागत नाही,” असा सज्जड इशारा देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना थेट घरचा आहेर दिला.पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातील महायुतीतील मतभेदांच्या पार्श्वभूमीवर प्रचारार्थ सोलापूर दौऱ्यावर आलेल्या सामंत यांनी पत्रकार परिषदेत विविध राजकीय मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले.

२७ तारखेनंतर सानप कोण, हे विरोधकांना समजेल

पुणे शिक्षक मतदारसंघात शिवसेनेने (शिंदे गट) सचिन सानप यांना पाठिंबा दिला आहे. या उमेदवारीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ‘आम्ही सानप यांना ओळखत नाही’, अशी खोचक टिप्पणी केली होती. या विधानाचा समाचार घेताना सामंत म्हणाले, “पालकमंत्री माझ्यापेक्षा प्रचंड उंचीचे नेते असल्याने मी त्यांच्यावर थेट बोलणे टाळतो. मात्र, ते आज सानप यांना ओळखत नसले, तरी २७ तारखेला निकाल लागून सानप विजयी झाल्यानंतर केवळ पालकमंत्रीच नव्हे, तर महाराष्ट्र आणि जिल्ह्यातील सर्वच नेते त्यांना ओळखतील. शिक्षकांचा आमदार हा शिक्षकच असला पाहिजे, ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट भूमिका आहे. सानप हे सामान्य, गरीब घरातील उमेदवार आहेत. ते कुठल्या बड्या संस्थाचालकाचा मुलगा नाहीत म्हणून त्यांना अशा पद्धतीने हिणवणे योग्य नाही. मैत्रीपूर्ण लढत म्हणजे भारत-पाकिस्तानची लढाई नाही.”गोकुळ’चा दाखला आणि सबुरीचा सल्ला महायुतीतील घटक पक्षांना सबुरीचा सल्ला देताना सामंत यांनी कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघातील राजकीय उलथापालथीची आठवण करून दिली. “सत्तेचा अहंकार बाळगल्यास मतदार काय भूमिका घेतात, हे ताज्या राजकीय घडामोडींवरून स्पष्ट झाले आहे. जरा शांततेने आणि सबुरीने घेतले तर महायुती सर्व ठिकाणी विजयी होऊ शकते. आपल्याला सत्तेत एकत्र राहायचे आहे, त्यामुळे कुणाचेही मन दुखावले जाणार नाही याचे भान सर्वांनीच ठेवले पाहिजे,” असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button