लांज्यात ७५ वर्षीय वृद्धेच्या खुनाचा १२ तासांत छडा; कर्जबाजारी आरोपीला अटक


सोन्याच्या बांगड्या-पाटल््या लुटून दिशाभूल करण्यासाठी हातात घातल्या नकली बांगड्या;


लांजा तालुक्यातील वेरवली रामगाव, लाडवाडी येथे ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिला वैशाली विलास हेगिष्टे यांच्या निर्घृण खूनप्रकरणाचा आणि सोन्याचे दागिने लुटल्याच्या गंभीर गुन्ह्याचा रत्नागिरी जिल्हा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावला आहे. कर्जबाजारीपणातून हा गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी प्रमोद प्रकाश खेडेकर (रा. वेरवली खुर्द, कातळवाडी, ता. लांजा) याला अटक करण्यात आली आहे.

भरदिवसा घरात घुसून खून

१९ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते साडेअकराच्या दरम्यान वैशाली हेगिष्टे या घरी एकट्याच असल्याची संधी साधून आरोपीने घरात प्रवेश केला. त्यानंतर त्यांचा निर्घृण खून करून त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या आणि दोन पाटल्या जबरदस्तीने काढून घेतल्या. चोरीचा संशय येऊ नये आणि पोलिसांची दिशाभूल व्हावी, या उद्देशाने आरोपीने त्यांच्या हातात नकली बांगड्या घातल्याचे तपासात समोर आले.

या घटनेनंतर लांजा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३०९(४) आणि ३३२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली

भरदिवसा घडलेल्या या गंभीर घटनेची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला गती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, लांजा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे आणि राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या नेतृत्वाखाली तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली.

पोलिसांनी गोपनीय माहिती, संशयितांची पडताळणी तसेच सायबर आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला. या तपासातून घटनास्थळापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर राहणाऱ्या प्रमोद खेडेकर याच्याविषयी संशय बळावला. त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, डोक्यावर असलेल्या कर्जामुळे हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या पथकाचे कौतुक

या तपास आणि कारवाईत पोलीस अधिकारी देवकन्या मैदाड, अमोद सरंगले, संदीप ओगले, प्रशांत बोरकर तसेच पोलीस अंमलदार सचिन भुजबळराव, नितेश राणे, प्रियांका कांबळे, प्रतीक्षा राणे, संजय मारळकर, विजय आंबेकर, गणेश सावंत, योगेश नार्वेकर, भैरवनाथ सवाईराम, दत्ता कांबळे आणि अतुल कांबळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

ज्येष्ठ महिलेच्या खुनासारख्या गंभीर गुन्ह्याचा अवघ्या १२ तासांत छडा लावल्याने रत्नागिरी जिल्हा पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button