
खेड तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा!
विजांच्या कडकडाटासह काही भागांत पावसाच्या सरी; भरणे येथे आंब्याचे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा
खेड : तालुक्यातील ग्रामीण भागासह खेड शहरात सोमवारी (दि. १९ ऑक्टोबर) दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी दोनच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले आणि सोसाट्याचा वारा सुटला. त्यानंतर तीन वाजल्यानंतर विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळू लागल्या. गेल्या चार दिवसांपासून जाणवणाऱ्या हवामानातील बदलानंतर अचानक झालेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
तालुक्यातील खाडीपट्टा, सातगाव परिसर, खोपी, शिरगाव आदी भागांत विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. खेड शहरात काही ठिकाणी हलक्या सरी कोसळल्या, तर ग्रामीण भागातील काही ठिकाणी पावसाचा जोर अधिक होता. अचानक बदललेल्या हवामानामुळे शहरासह ग्रामीण भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.
दुष्काळसदृश परिस्थितीचा सामना करणाऱ्या तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी या पावसामुळे काही प्रमाणात आशा निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असला, तरी शेतीसाठी या पावसाचा नेमका कितपत फायदा होईल, हे पुढील हवामानावर अवलंबून राहणार आहे.
शारदीय नवरात्रोत्सव सुरू असल्याने खेडच्या बाजारपेठेत भाविकांची वर्दळ होती. तसेच दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर खरेदीसाठी शहरात आलेल्या नागरिकांची अचानक आलेल्या पावसामुळे धावपळ उडाली. दुकानांसमोरील शेडचा आडोसा घेत अनेकांनी पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला. बसस्थानक परिसरातही प्रवाशांची पावसापासून सुरक्षित ठिकाणी जाण्यासाठी धावपळ झाली. त्यामुळे काही काळ बाजारपेठेतील जनजीवनावर पावसाचा परिणाम जाणवला.
दरम्यान, भरणे येथील तु. बा. कदम महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंब्याचे झाड कोसळल्याने वाहतुकीत अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने ग्रामस्थांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने झाड बाजूला केले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तत्काळ पूर्ववत करण्यात आली.
या कामात ग्रामस्थ संतोष नलावडे, ग्रामसेवक प्रशांत आग्रे यांच्यासह अन्य स्थानिक रहिवाशांनी सहकार्य केले. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे एकीकडे उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला, तर दुसरीकडे बाजारपेठेतील वर्दळ आणि वाहतुकीवर त्याचा परिणाम जाणवला. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त होत आहे.




