
बिजघरमध्ये परसबागेत रानटी जावडी मांजराचा वावर;
खेड : तालुक्यातील बिजघर गावात स्वामी भगवानबुवा जंगम यांच्या घराच्या परसबागेत रानटी जावडी मांजर आढळून आल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र वनविभागाने तत्परता दाखवत या वन्यप्राण्याला सुरक्षितरीत्या पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेची माहिती मिळताच निवृत्त पोलीस अधिकारी तथा पंचक्रोशीतील ज्येष्ठ सामाजिक नेते कृष्णाजीराव महादेवराव भोसले यांनी तातडीने वनविभागाशी संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. त्यानंतर वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अत्यंत सावधगिरीने कोणतीही इजा न होऊ देता रानटी जावडी मांजराला जेरबंद केले.
आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित वन्यप्राण्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. वनविभागाच्या त्वरित आणि दक्ष कारवाईमुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही. या संपूर्ण कारवाईदरम्यान ग्रामस्थांनीही वनविभागाला मोलाचे सहकार्य केले.
दरम्यान, पावसाळ्यात अन्न व निवाऱ्याच्या शोधात वन्यप्राणी मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण वाढत असल्याचे या घटनेवरून पुन्हा अधोरेखित झाले आहे. परिसरात कोणताही वन्यप्राणी आढळल्यास त्याला पकडण्याचा किंवा हाकलून लावण्याचा प्रयत्न न करता त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाने नागरिकांना केले आहे.




