वि.जा.भ.ज. आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते विद्यार्थींनींना प्रमाणपत्र क्रांतिसूर्य महात्मा फुले जयंती द्विशताब्दी वर्ष व राष्ट्रीय सांख्यिकी दिनाचे औचित्य कोकण आणि महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम इतर मागास बहुजन कल्याण विभागाचा पुढाकार


रत्नागिरी, दि. २१ ) :- महाराष्ट्र शासनाच्यावतीने क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती द्विशताब्दी वर्ष तसेच ‘राष्ट्रीय सांख्यिकी दिना’निमित्त इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्यावतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती (वि.जा.भ.ज.) आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘प्रज्ञाशोध परीक्षा २०२६’ चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थीनींना आज जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
यामध्ये माध्यमिक आश्रम शाळा जावडेच्या विद्यार्थींनी रीना जाधम इयत्ता सातवी, आयुषी महाडीक इयत्ता नववी, माध्यमिक आश्रमशाळा निवेच्या विद्यार्थींनी ईश्वरी पेढांरे इयत्ता सातवी आणि स्वरा गोपाळ इयत्ता नववी यांचा समावेश आहे.
यावेळी इतर मागास बहुजन कल्याण सहायक संचालक उदयसिंह गायकवाड, इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी अपूर्वा कारंडे, हेरिटेज संस्था लांजाच्या संस्थाचालक माजी पंचायत समिती सभापती ॲङ अपर्णा पवार, संतोष कांबळे, दलित सेवा संस्था निवे बुद्रुकचे मुख्याध्यापक विजय पाटील, शिक्षक नामदेव पाटील आदी उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आश्रम शाळांमध्ये शिकणाऱ्या इयत्ता ७ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांना सांख्यिकी (संख्याशास्त्र) विषयाची गोडी लागावी आणि आजच्या स्पर्धात्मक युगात स्पर्धा परीक्षांविषयी त्यांच्यात आत्मविश्वास व आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने या परीक्षेचे आयोजन करण्यात आल्याचे इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी श्रीमती कारंडे यांनी सांगितले. या उपक्रमाला जिल्ह्यातील आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला. अशा प्रकारे वि.जा.भ.ज. आश्रम शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करण्याचा हा कोकण विभागासह संपूर्ण महाराष्ट्रातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई विभागाचे प्रादेशिक उपसंचालक दिलीप राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रीमती कारंडे यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत शिक्षणाचे महत्त्व विशद केले. तसेच दैनंदिन जीवनातील संख्याशास्त्राचे स्थान आणि भविष्यातील स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.
जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचा विद्यार्थीनींशी संवाद
कोकण विभागातील आश्रमशाळा आज केवळ स्थानिकच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण आणि सर्वांगीण विकासाचे एक प्रमुख केंद्र ठरत असल्याचे, आश्रमशाळेतील विद्यार्थी व शिक्षकांशी मनमोकळा संवाद साधताना गौरवोद्गार जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी काढले. यशस्वी विद्यार्थीनींचे कौतुक करत त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या वेळी झालेल्या चर्चेदरम्यान स्वरा, रीना, आयुषी आणि ईश्वरी या विद्यार्थिनींची विचारपूस करून त्यांची शैक्षणिक प्रगती जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतली. विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच शिक्षकांच्या भूमिकेचाही गौरव केला. “विद्यार्थ्यांना घडवणे, त्यांच्यावर योग्य संस्कार करणे, आदर्श देणे आणि त्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण मिळवून देणे हे अत्यंत महत्त्वाचे काम आहे; ज्यामुळे मुलांचा सर्वांगीण व बौद्धिक विकास होतो,” असे मत यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
उत्कृष्ट वातावरणामुळे १२ जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांचा ओघ
पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत कोकण विभागात आश्रमशाळांची संख्या मर्यादित असली, तरीही असोंडे, दाभोळे व इतर माध्यमिक आश्रमशाळांमध्ये उपलब्ध करून दिलेला शिक्षणाचा दर्जा आणि सुविधा यामुळे राज्यभरातून विद्यार्थी येथे येत आहेत. पुणे, वर्धा, नांदेड यांसारख्या तब्बल १२ जिल्ह्यांतून विद्यार्थी कोकणात येऊन १० ते १२ वर्षे राहून आपले शालेय शिक्षण पूर्ण करतात, ही बाब संपूर्ण विभागासाठी अभिमानास्पद असल्याचे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक विजय पाटील तसेच हेरिटेज संस्था लांजाच्या ॲङ अपर्णा पवार आणि संतोष कांबळे यांनी यावेळी नमूद केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button