वाचन प्रेरणा सन्मानाने सामाजिक कार्यकर्त्या श्रद्धा कळंबटे सन्मानित


 भारताचे माजी राष्ट्रपती ,भारतरत्न डॉ. ए .पी .जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी 15 ऑक्टोबर रोजी 'वाचन प्रेरणा दिन' साजरा करण्यात येतो. हे औचित्य साधून भाषा संचालनालय ,मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन आणि शासकीय विधी महाविद्यालय ,मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. 
   आपली नोकरी ,व्यवसाय, घर संसार सांभाळून वैयक्तिक पातळीवर व तळागाळातील गरजू समाजामध्ये वाचन संस्कृती रुजवण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील दहा वाचन प्रेरकांना वाचन दूत म्हणून वाचन प्रेरणा सन्मान 2026 या सन्मानाने सन्मानित करण्यात आले .यात मानचिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट व प्रत्येकी दहा हजार रुपये यांचा समावेश आहे.
   कोकण विभागातून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, श्रद्धा कळंबटे यांची निवड करण्यात आली होती. गेली 25 वर्षे त्या झोपडपट्टी, निरीक्षणगृह, बालगृह यातील मुलं, रत्नागिरी विशेष कारागृहातील बंदी जन यांच्यासाठी वाचनालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृती रुजवत आहेत. झोपडपट्टीत जातपात धर्म विरहित वाचन चळवळ त्यांनी रुजवली. विशेष कारागृहात या चळवळीतूनच' मुक्ताकांक्षा' हा बंदी जनांचा कवितासंग्रह त्यांनी संपादित केला. निरीक्षण गृह, बालगृहात विविध उपक्रम त्यांनी राबवले. 'वाचक वीर' हा सन्मान जास्त पुस्तके वाचणाऱ्यांना दिला जातो. त्यांच्या घरी स्वतःचा विविध विषयांनुरूप32 प्रकारचा पुस्तक संग्रह आहे .यात हजारो पुस्तकं, मासिकांचा समावेश आहे. हा संग्रह समाजातील पीडित, अन्यायग्रस्त, गरजू लोकांसाठी विशेषतः महिला ,मुलींसाठी खुला आहे. 
   हा सन्मान स्वीकारताना कळंबटे यांनी भाषा संचालनालय, मराठी विभाग व शासकीय विधी महाविद्यालय तसेच राज्याचे भाषा मंत्री मा.डॉ. उदयजी सामंत यांचे आभार मानले .या पुरस्कारामुळे ही वाचन चळवळ आणखी जोमाने वाढविण्याचा मानस व्यक्त करून बंदीजनांचा कवितासंग्रह त्यांनी विधी महाविद्यालयाच्या ग्रंथ संग्रहाला भेट म्हणून दिला. 
    या कार्यक्रमाला महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती माननीय श्री सचिन अहिर, मराठी भाषा विभागाचे उपसचिव माननीय डॉ.नामदेव भोसले ,शासकीय विधी महाविद्यालय मुंबईच्या प्राचार्य माननीय डॉ. अस्मिता वैद्य, भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्याचे भाषा संचालक माननीय श्री अरुण गीते तसेच समीक्षक डॉक्टर नितीन रिंढे, डॉ. विजय ककडे यांची उपस्थिती लाभली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button