
‘भू’ पोस्ट ऑफिससाठी भाडेतत्त्वावर जागा हवी; रत्नागिरी डाक विभागाकडून सीलबंद निविदा मागविल्या
रत्नागिरी, दि. २१ )- भारतीय डाक विभागाच्या अखत्यारीतील ‘भू’ पोस्ट ऑफिसच्या कामकाजासाठी भाडेतत्त्वावर तयार इमारत मिळविण्याकरिता रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक यांच्यामार्फत सीलबंद निविदा मागविण्यात येत आहेत. या संदर्भातील माहिती रत्नागिरी विभागाच्या डाक अधीक्षकांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
इच्छुक जागा मालकांनी लेखी अर्जासोबत इमारतीचा ढोबळ नकाशा, चटई क्षेत्रफळ (चौ. फूट), अपेक्षित भाडे, इमारतीचा असेसमेंट उतारा तसेच इमारत कधी उपलब्ध होईल त्या तारखेचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. हा अर्ज सीलबंद लिफाफ्यात ठेवून त्यावर “भू पोस्ट ऑफिस करिता इमारत भाडे तत्वावर देणेबाबत” असा ठळक उल्लेख करावा.
निविदा सादर करण्याचा तपशील:
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: अधीक्षक डाकघर, रत्नागिरी विभाग, रत्नागिरी – ४१५६१२.
- अंतिम मुदत: १६ नोव्हेंबर २०२६, दुपारी २ वाजेपर्यंत.
- निविदा उघडण्याची वेळ: १६ नोव्हेंबर २०२६, दुपारी ३:३० वाजता (उपस्थित राहू इच्छिणाऱ्या निविदाकारांसमक्ष).
प्रमुख अटी व शर्ती: - जागेचे स्थान व क्षेत्रफळ: इमारत ग्राहकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने मध्यवर्ती ठिकाणी तसेच तळमजल्यावर असावी. उघडा व्हरांडा व मोकळी जागा वगळून किमान ४१० चौरस फूट क्षेत्रफळ असणे आवश्यक आहे.
- पायाभूत सुविधा: स्वतंत्र पाणीपुरवठा, स्वतंत्र वीज मीटर, वीज-पंख्यांची सोय, वॉश बेसिन, जनरेटरसाठी ३-फेज कनेक्शन आणि शेड असणे अनिवार्य आहे.
- शौचालयाची सोय: पोस्ट कर्मचाऱ्यांसाठी इमारतीत किंवा इमारतीला लागून नळपाण्यासह स्वतंत्र वैयक्तिक शौचालय असणे आवश्यक आहे.
- भाडेकरार: निविदा मंजूर झाल्यास संबंधित जागा मालकाला स्वखर्चाने डाक विभागाच्या नियमांनुसार ५ वर्षांसाठी नोंदणीकृत (रजिस्टर्ड) भाडेकरार करून द्यावा लागेल.
- कर: इमारत कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये असल्यास नियमानुसार जीएसटी (GST) लागू राहील.
कोणतीही किंवा सर्व निविदा कारण न देता नाकारण्याचा अधिकार डाकघर अधीक्षकांनी राखून ठेवला असून त्यांचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहील.




