
बॅटरी चमकली, रानडुकराचा डोळा समजून गोळी झाडली, मनपा कर्मचारी ठार, डॉक्टरसह ६ अटकेत, घोडबंदरच्या जंगलात नेमकं काय घडलं?
Mistaking it for the eyes of a wild boar, a bullet was fired. A municipal employee named Vijay Sapte died in this firing : रानडुकराच्या शिकारीसाठी मुंबईजवळच्या घोडबंदरमधील जंगलात गेलेल्या शिकाऱ्यांच्या एका टोळीतील एका व्यक्तीचा त्याच टोळीतील शिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
रानडुकराच्या शिकारीसाठी शिकाऱ्यांची ही टोळी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात घुसली होती. मात्र दोन गटात विभागून वेगवेगळ्या वाटांनी जंगलात शिरलेल्या या टोळीने शिकार शोधण्यास सुरुवात केल्यावर रात्रीच्या अंधारात बॅटरीच्या चमकलेल्या उजेडाला दुसऱ्या गटातील शिकाऱ्याने रानडुकराचा डोळा समजून गोळी झाडली. या गोळीबारात विजय सापटे नावाच्या मनपा कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून, आणखी दोघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई करत खोटं मृत्यू प्रमाणपत्र देणाऱ्या एका डॉक्टरसह सहा जणांना अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिका माहितीनुसार चेना गाव परिसरातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पाच ते सहा जणांचा एक गट रानडुकरांच्या शिकारीसाठी गेला होता. त्यांच्याकडे बंदुका, छर्रे व अन्य साहित्य होते. मध्यरात्री जंगलात उतरताना बॅटरीच्या प्रकाशात शिकार सुरू असताना, अंधारात प्राण्याचे डोळे समजून एका शिकाऱ्याने त्या दिशेने गोळीबार केल्याचे सांगितले जात आहे. या गोळीबारात विजय सुखरू सापटे (६०) यांच्या छातीत गोळी लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सापटे हे पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. तर कुणाल शेलार आणि कल्पेश ढगळा हे दोघे या घटनेत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. यापैकी एकाच्या मांडीला, तर दुसऱ्याच्या खांद्याला गोळी लागल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या गोळाबारात ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला त्याचा एक अल्पवयीन मुलगाही या घटनेवेळी तिथे होता, अशी माहितीही समोर आली आहे.
या घटनेबाबत एका समाजसेवकाने पोलिसांना माहिती दिली होती. त्यानंतर या दुर्घटनेत जखमी झालेल्या तरुणांनी मासेमारी करताना स्फोटकाचा स्फोट होऊन आपल्या अंगात छर्रा घुसल्याचा बनाव केला. नदीच्या पाण्यात स्फोटक टाकून मासेमारी करत असताना स्फोट झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, पोलिस चौकशीत सत्य समोर आले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता तेथे रक्ताचे डाग आढळल्याची माहिती आहे.
दरम्यान, शिकारीदरम्यान, गोळी लागून विजय सपाटे गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी त्यांना जवळच्या रुग्णालयात नेले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर या सर्वांनी त्यांना डॉक्टर राजेश पालांडे यांच्याकडे नेले. तिथे विजय पालांडे यांचा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यासाठी डॉक्टर पालांडे यांनी सापटे यांचा मृत्यू घरीच हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे नमूद करणारे प्रमाणपत्र दिले. त्यानंतर कारवाईच्या भीतीमुळे पोलिसांना घटनेची माहिती न देताच मृत विजय सापटे यांच्यावर पहाटेच्या अंधारातच परस्पर अंत्यसंस्कार करण्यात आले, असा आरोप करण्यात येत आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी संबंधित डॉक्टर राजेश पालांडेसह सहा जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.


