भूस्खलन रोखण्यासाठी संरक्षण भिंतीची मागणी; आ. किरण सामंत यांचे सकारात्मक आश्वासन


राजापूर : मुसळधार पावसामुळे होणारे भूस्खलन व भूधूप रोखून संभाव्य नैसर्गिक आपत्ती टाळण्यासाठी गुजराळी (ता. राजापूर) येथील रहिवासी हर्षद हणमंत रानडे यांनी आमदार किरण सामंत यांच्याकडे निवेदन सादर करून प्राधान्याने पक्क्या संरक्षण भिंती उभारण्याची मागणी केली आहे. यावर आ. सामंत यांनी या कामाबाबत सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.
श्री. रानडे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, गुजराळी येथील त्यांचे वडिलोपार्जित घर व जागा डोंगराच्या उतारावर असून जागेला लागून रानतळे–दिवटेवाडी परिसरातून वाहणारा मोठा नाला आहे. पावसाळ्यात या नाल्यातून मोठ्या वेगाने पाणी वाहत असल्याने नाल्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात भूधूप होत असून जमीन खचत आहे. त्यामुळे त्यांच्या पारंपरिक विहिरीलाही धोका निर्माण झाला आहे. ही विहीर कुटुंबासाठी पिण्याच्या पाण्याचा एकमेव स्रोत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.
या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून नाल्यालगत त्यांच्या जागेच्या बाजूने सुमारे सहा मीटर उंचीची पक्की काँक्रीट संरक्षण भिंत उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय, त्यांच्या घरासमोरून जाणाऱ्या नगरपरिषदेच्या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी त्यांच्या जागेचा काही भाग संपादित करण्यात आला आहे. या ठिकाणी सध्या उभारण्यात आलेली तात्पुरती दगडी संरक्षण भिंत दर पावसाळ्यात ढासळत असल्याने तेथेही तीन मीटर उंचीची पक्की काँक्रीट संरक्षण भिंत उभारण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
राजापूर तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत असल्याने भविष्यात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी होण्यापूर्वी आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या दोन्ही ठिकाणी संरक्षण भिंतींची उभारणी तातडीने करणे आवश्यक असल्याचे श्री. रानडे यांनी निवेदनात म्हटले आहे. तसेच या कामांना प्राधान्याने प्रशासकीय मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button