दापोलीत नव्याने बांधलेली भिंत कोसळली, घरांनाही धोका


दापोली शहरातील फंडके दवाखाना गल्ली परिसरातील फॅमिली माळजवळ नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीचा एक मोठा भाग मुसळधार पावसामुळे कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे ही भिंत याच २०२६ मध्ये बांधण्यात आली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे भिंतीला मोठे नुकसान झाले असून तिचा एक भाग पूर्णपणे कोसळला आहे. उर्वरित भिंतीलाही तडे गेल्याने ती कोणत्याही क्षणी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
भिंत कोसळल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भिंतीलगत असलेल्या घरांनाही यामुळे धोका निर्माण झाला असून, आणखी काही भाग कोसळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. सुदैवाने ही घटना घडली त्यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सतत सुरू असलेल्या पावसामुळे माती खचत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनत आहे.
घटनेची माहिती मिळताच दापोलीच्या तहसिलदार अर्चना बोंबे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहाणी केली. त्यांनी संबंधित जागेची प्रत्यक्ष पाहाणी करून संभाव्य धोका लक्षात घेत नागरिकांना सावध राहाण्याच्या सूचना दिल्या. भिंतीजवळ अनावश्यक वर्दळ करू नये तसेच धोकादायक भागापासून सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच संबंधित यंत्रणांना आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याची माहिती मिळाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button