कोंडये ब्रिजवरील गंभीर गुन्ह्यातील तीन वर्षांपासून फरार आरोपीला अटक


तांत्रिक तपासाच्या आधारे राजापूर पोलिसांची कारवाई; सोलापूरमधून आरोपी ताब्यात


राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडये ब्रिजवर घडलेल्या गंभीर गुन्ह्यात गेल्या तीन वर्षांपासून फरार असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील आरोपीला अखेर अटक करण्यात राजापूर पोलिसांना यश आले आहे. गोपनीय माहिती आणि अत्याधुनिक तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली.

गणेश शाहीर मोरे (रा. वडवळ, ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

या प्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ११९/२०२३ अन्वये भारतीय दंड विधानाच्या कलम ३५३, ४६७, ४६८, १२० (ब) तसेच भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम ३/२५ आणि २७ नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील पुणे येथील आठ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली असून, त्यांच्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मात्र, गणेश मोरे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता.

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नितीन बगाडे यांनी जिल्ह्यातील फरारी आणि पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूरचे पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी विशेष तपास पथक नियुक्त केले.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक सुधीर उबाळे, पोलीस अंमलदार दीपक काळे आणि सागर कातकर यांचा समावेश होता. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपीच्या हालचालींचा माग काढला. त्यानंतर सापळा रचून गणेश मोरे याला ताब्यात घेतले.

तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करण्यात राजापूर पोलिसांना यश आल्याने या कारवाईची चर्चा सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button