मुंबई-गोवा महामार्गावरील नव्या काँक्रीट रस्त्यावर भेगा; सिमेंट भरून दुरुस्तीचा प्रयत्न, गुणवत्तेवर सवाल

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्यावर काही ठिकाणी भेगा पडल्याचे समो ओर आले असून, खेड तालुक्यातील निगडे (बोरज परिसर) येथे त्या भेगा हाताने सिमेंट टाकून भरल्या जात असल्याचा प्रकार उघड झाल्याने रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसानंतर महामार्गाच्या काही भागात पाणी साचणे, माती वाहून जाणे आणि काँक्रीट रस्त्यावर तडे दिसून येण्याच्या घटना घडल्या आहेत. या भेगा अतिवृष्टीमुळे पडल्या की बांधकामातील त्रुटींमुळे, याबाबत तांत्रिक तपासणीची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रस्त्यावरील भेगांमुळे दुचाकीस्वारांना अडचणींचा सामना करावा लागत असून किरकोळ अपघातांच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी भेगा सिमेंटने भरून दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ आणि छायाचित्रेही समोर आल्याने महामार्गाच्या दर्जावर चर्चा सुरू झाली आहे.

गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना आधीच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच नव्याने तयार झालेल्या काँक्रीट रस्त्यावर भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

या प्रकरणाची सखोल तांत्रिक चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी आणि महामार्गावरील भेगांची शास्त्रोक्त पद्धतीने दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button