
खेडमध्ये डेंग्यूसह मलेरियाची स्थिती नियंत्रणात
खेड शहरासह ग्रामीण भागात यंदाच्या पावसाळ्यात आरोग्य यंत्रणेच्या सतर्कतेमुळे कीटकजन्य आजार नियंत्रणात असल्याचे समोर आले आहे. प्राप्त अधिकृत आकडेवारीनुसार या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजेच जानेवारी ते जुलैअखेरपर्यंत तालुक्यात मलेरियाचे ४ रुग्ण आढळले आहेत. तर डेंग्यूच्या रुग्णांची संख्या शून्य नोंदवली गेली आहे.
तालुक्यात डेंग्यूसह मलेरियाची साथ उद्भवणार नाही, याकडे तालुका आरोग्य यंत्रणेने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्याच्या कालावधीत शहरापासून ग्रामीण भागापर्यंत विशेष आरोग्य शिबिरे, घरोघरी सर्वेक्षण आणि डासोत्पत्ती स्थान नष्ट करण्यासाठी धुरीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती, यामुळे साधीच्या आजारांवर प्रभावी नियंत्रण मिळवणे शक्य झाले. तालुक्यात डेंग्यूचा एकही रुग्ण न आढळल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.
आकडेवारी नियंत्रणात असली तरी पावसाळा आणि त्यानंतरचे डेंग्यू व ढगाळ वातावरणामुळे मलेरियाचा धोका टाळण्यासाठी घराभोवती किंवा कुलूपबंद इमारतींच्या परिसरात डबक्यांमध्ये किंवा साहित्यात पाणी साचून डासांची पैदास होऊ देऊ नये, पाणी उकळून आणि गाळून प्यावे, सलग तीन दिवसांपेक्षा जास्त काळ ताप असल्यास किंवा अंगदुखी असल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात रक्ताची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




