
चिपळूणमध्ये जलजीवन मिशन रखडले
ग्रामीण भागातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी हर घर जल घोषवाक्य घेऊन सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशनच निधीअभावी गेले २ ते ३ वर्षापासून रखडल्याचे चित्र आहे. चिपळूण तालुक्यातील १३३ गावांमध्ये या योजनेची कामे सुरू करण्यात आली असून, त्यासाठी १०४.४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. आतापर्यंत ५८.६३ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मात्र, काम सुरू करण्याचे आदेश मिळालेल्या गावांपैकी केवळ ३७.५९ टक्के काम भौतिकदृष्ट्या पूर्ण झाल्याची नोंद आहे. त्यामुळे गावागावांतील पाणीपुरवठा योजनांचे भवितव्य अधांतरी असून, या कामांना निधी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक घराला नळाद्वारे पाणी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
मात्र, चिपळूण तालुक्यातील योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतल्यास अनेक कामे अद्याप अपूर्ण असल्याचे दिसते. ९ गावांची योजना प्रगती २५ टक्क्यांपर्यंत, चार गावांची २५ ते ५० टक्के, तर ३५ गावांच्या योजनेचे ५० ते ७५ टक्क्यांदरम्यान काम झाले आहे. तर ३५ गावांची कामे ७५ ते १०० टक्केच्या दरम्यान पोहोचली आहेत तर ५० गावांचे काम पूर्ण झाल्याची आकडेवारी आहे. या आकडेवारीनुसार अनेक योजनांची कामे अंतिम टप्प्यात असली, तरी ती पूर्ण होणे आणि प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होणे महत्त्वाचे आहे. संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर ही योजना जलदगतीने पूर्णत्वास जाणे आवश्यक आहे.




