
ध्वनिफितीवरून खडाजंगी; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘अडीच वर्षांनंतर क्लिप बाहेर येण्यामागचा हेतू काय?’
मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या पाचशे कोटी रुपयांच्या कथित व्यवहाराच्या ध्वनिफितीवरून राज्यातील राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ध्वनिफितीची न्यायवैद्यकीय तपासणी करण्याचे आश्वासन दिले.मात्र, अडीच वर्षांनंतर ही ध्वनिफीत बाहेर आणण्यामागचा हेतू काय, यातून कुणाला लक्ष्य केले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. दुसरीकडे, शिंदेसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर एकनाथ शिंदे यांना राजकीयदृष्ट्या संपवण्याचे षड्यंत्र रचल्याचा आरोप केला. भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी हा आरोप फेटाळत महायुतीत वाद निर्माण करू नये, असा इशारा दिला.नागपुरात मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप, शिंदेसेना आणि जरांगे यांनीही चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे ध्वनिफितीची आणि त्यातील संभाषणाची फॉरेन्सिक तपासणी करून सत्य स्पष्ट केले जाईल, असे त्यांनी सांगितले.त्या क्लिपमधील आवाज माझा नाही, असा दावा, भाजपच्या माध्यम विभागाच्या श्वेता शालिनी यांनी केला आहे. आपण विधानसभेच्या टीममध्ये नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.ध्वनिफितीतील संभाषण खरे आहे की बनावट, याची तज्ज्ञांकडून तपासणी व्हावी, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. विशेष तपास पथकाला स्वतंत्रपणे काम करू द्यावे, असेही ते म्हणाले.




