जिल्ह्यात एकाच दिवशी सहाजणांना सर्पदंश


पावसाचा जोर वाढताच कोकणात एकाबाजूला भातलावणीच्या कामांना वेग आला असताना, दुसर्‍या बाजूला मात्र बळीराजावर सर्पदंशाचे संकट ओढवले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज, १० जुलै रोजी काळजाचा थरकाप उडवणारी एक धक्कादायक घटना समोर आली. शेतात राबणान्या शेतकर्‍यावर जणू काळाने झडप घातली, जेव्हा जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागांत तब्बल ६ जणांना एकाच दिवशी सर्पदंश झाला. या एकाच वेळी घडलेल्या घटनांमुळे संपूर्ण जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली असून, सुदैवाने सर्व बाधितांना वेळेत रुग्णालयात दाखल केल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.
भातशेतीची कामे करताना अचानक समोर आलेल्या सापांनी य सर्वांवर हल्ला केला. यामध्ये गोळ्य येथील ५२ वर्षीय गिरीश कृष्णा मयेकर, लांजा तालुक्यातील खानवली येथील ६५ वर्षीय संजीवनी जयवंत गुरव, तसेच रत्नागिरीतील ६५ वर्षीय मीरा पांडुरंग होरंबे आणि कोतवडे येथील ५० वर्षीय स्नेहलता एकनाथ धुमक यांचा समावेश आहे. याशिवाय गुहागर तालुक्यातील नरवण येथील ८७ वर्षीय वृद्ध महिला लक्ष्मी दत्तात्रय देवूडकर आणि बसणी येथील २० वर्षीय तरुण आराध्य महेश नेवरेकर हे देखील या सर्पदंशाचे बळी ठरले. सर्पदंश झालेल्या सर्व ६ जणांना तातडीने रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी आणि वैद्यकीय पथकाने कोणतीही वेळ न गमावता या सर्वांवर तात्काळ आपत्कालीन उपचार सुरू केले. रुग्णालयाकडून मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, योग्य वेळी वैद्यकीय मदत मिळाल्यामुळे या सहाही जणांची प्रकृती सध्या पूर्णपणे स्थिर असून त्यांच्या जीवाला कोणताही धोका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button