
गणेशोत्सवासाठी कोकणवासियांना मोठा दिलासा; ठाण्यात तिकटीसाठी ११ ते ३१ जुलैदरम्यान अतिरिक्त आरक्षण खिडक्या,
गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर व्हावा, यासाठी खासदार नरेश म्हस्के यांच्या मागणीची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने ठाणे रेल्वे स्थानकाजवळील आरक्षण केंद्रात फक्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी दोन अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या सुरू केल्या आहेत.११ ते ३१ जुलै दरम्यान या खिडक्या कार्यान्वित राहणार आहेत. त्यामुळे कोकणवासीयांनी या सेवेचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी खासदार नरेश म्हस्के यांनी केले.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होण्यासाठी खासदार नरेश म्हस्के प्रयत्नशील असतात. गतवर्षी प्रमाणे यावर्षीही त्यांच्या पाठपुराव्यामुळे गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकातील आरक्षण केंद्रात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त खिडक्या सुरु झाल्या आहेत. खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.
मतदारसंघातील कोकणवासीय बांधवांनी केलेल्या मागणीचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने सावंतवाडी स्थानकावर ३ प्रमुख गाड्यांना थांबा देण्याची मागणी मान्य केली आहे. ट्रेन नंबर 12133 – मंगलोर एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12431 – राजधानी एक्सप्रेस, ट्रेन नंबर 12201 – गरीब रथ एक्सप्रेस या गाड्या लवकरच सावंतवाडी स्थानकावर थांबणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल खासदार नरेश हस्के यांनी रेल्वे प्रशासन आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे जाहीर आभार मानले आहेत.




