
दापोली तालुक्यातील करंजाणी येथून अज्ञाताकडून दागिने लंपास
दापोली तालुक्यातील करंजाणी दर्भाची वाडी येथील एका घरातून १ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करंजाणी दर्भाचीवाडी येथील संतोष साळवी यांची आई सुलोचना साळवी एकट्याच घरी राहात होत्या. २७ मार्च रोजी त्यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच संतोष साळवी करंजाणी येथे आले असता त्यांना घराचा मागील दरवाजा उघडा दिसला. तसेच आईच्या गळ्यात असलेली सोन्याची बोरमाळ व अन्य सोन्याचे दागिने अंगावर दिसले नाहीत.
आईचे क्रिया कर्म झाल्यावर त्यांनी घरात सर्वत्र या दागिन्यांचा शोध घेतला असता त्यांना हे दागिने घरात आढळून आले नाहीत. त्यामुळे कोणीतरी अज्ञात चोरट्याने घरातील १ लाख २० हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेल्याची तक्रार संतोष साळवी यांनी दापोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास महेश पाटील करत आहेत.www.konkantoday.com




