
लाठी-काठी विश्वविक्रमात चिपळूणच्या गार्गी पुरोहितची चमकदार कामगिरी
चिपळूण, प्रतिनिधी: पारंपरिक मराठी युद्धकलेचा जागतिक स्तरावर गजर करणाऱ्या लाठी-काठी विश्वविक्रम उपक्रमात चिपळूणच्या गार्गी पराग पुरोहित हिने उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला आहे. तिच्या या यशामुळे चिपळूण शहराच्या मानात भर पडली असून सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.
नवी मुंबई येथे आयोजित या भव्य उपक्रमात देशभरातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. लाठी राष्ट्रीय पंच श्री. सुरेंद्र शिंदे व सौ. कविता शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात गार्गीने शिस्तबद्ध आणि प्रभावी सामूहिक प्रात्यक्षिक सादर करत उपस्थितांची मने जिंकली. या कामगिरीची नोंद Golden Book of World Records मध्ये करण्यात आली आहे.
गार्गीच्या यशामागे तिची जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण सराव महत्त्वाचा ठरला आहे. तिचे वडील श्री. पराग पुरोहित हे ‘रॉयल मेडिकल’चे संचालक असून आई सौ. नीलम पुरोहित या प्राथमिक शिक्षिका आहेत. तसेच आजी-आजोबा आणि कुटुंबीयांचे संस्कार व मार्गदर्शनही तिच्या यशामागे प्रेरणादायी ठरले.
लाठी-काठी ही केवळ क्रीडा नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यपरंपरेशी निगडित असलेली समृद्ध कला आहे. या कलेमुळे तरुणांमध्ये आत्मविश्वास, शिस्त आणि सांस्कृतिक जाणीव वाढीस लागते. गार्गीच्या यशामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार असून तिचे उदाहरण भावी पिढीसाठी आदर्श ठरणार आहे.
गार्गी पुरोहित हिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून चिपळूणकरांसाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.




