शताब्दी वर्षानिमित्त रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण

रत्नागिरी : वेदांमधील ओम चिन्ह हे वेद व शास्त्रांचे आद्य बोधचिन्ह आहे. बोधचिन्ह कळण्यासाठी आचरण शुद्ध पाहिजे व विचार हा अत्यंत मन व बुद्धी यांच्या एकत्रीकरणातून प्रकटलेला पाहिजे. रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे बोधचिन्ह अनावरण करताना आनंद होतोय. संघाचे बोधवाक्य सदाचार: परमो धर्म: हे संस्थेच्या यशस्वी शताब्दीकडे वाटचालीचे द्योतक म्हणावे लागेल, असे प्रतिपादन वेदमूर्ती विनायकशास्त्री पोखरणकर गुरुजी यांनी केले.

रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या राणी लक्ष्मीबाई सभागृहात अक्षय्य तृतीयेनिमित्त संघाच्या बोधचिन्हाचे अनावरण केल्यानंतर ते बोलत होते. याप्रसंगी अॅड. रुची महाजनी, संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर आणि उपाध्यक्ष मानस देसाई आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

अक्षय्य तृतीयनेनिमित्त मान्यवरांच्या हस्ते भगवान परशुराम, राणी लक्ष्मीबाईंच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी २०२७-२८ हे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष असल्याबद्दल माहिती दिली. वर्षभर विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. आज बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले असून या पुढील काळात नवनवीन उपक्रमांची आखणी करण्यात आल्याचे सांगितले. उपाध्यक्ष मानस देसाई यांनी बोधचिन्हांची संकल्पना विषद केली.

याप्रसंगी प्रमुख पाहुण्या ॲड. महाजनी यांनी सांगितले की, कऱ्हाडे ब्राह्मण संघ अविरतपणे १०० वर्षे कार्यरत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. सामाजिक मूल्यांसाठी ज्ञातीबांधवांनी योगदान दिले पाहिजे. कारण हिंदु समाजात कुटुंब प्रबोधनाची गरज निर्माण झाली आहे. हिंदुत्व टिकवण्यासाठी ब्राह्मण समाजानेही योगदान देण्याची गरज आहे. अलीकडे सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तरुण पिढीची संख्या कमी असते. या पिढीला अशा उपक्रमात सक्रिय करण्याची आवश्यकता आहे.

बोधचिन्ह साकारणाऱ्या कलाकार सिद्धी वैद्य यांचा या कार्यक्रमात सत्कार करण्यात आला. या बोधचिन्हात राणी लक्ष्मीबाईंचे चित्र साकारले असून शताब्दी व संघाची दोन बोधचिन्हे साकारली आहेत. याप्रसंगी डॉ. बी. डी. पाध्ये यांनी दिलेल्या देणगीतून संघातर्फे आदर्श परिचारिका म्हणून सौ. ऋतुजा काळगी यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी संघाचे सर्व पदाधिकारी, संचालक व ज्ञातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालिका प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सूत्रसंचालन केले. संचालक उमेश आंबर्डेकर यांनी आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button