
पालकमंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून लवकरच रत्नागिरी शहरात आता डीप क्लीन मोहीम सुरू होणार
रत्नागिरी शहराचा चेहरामोहरा स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत लवकरच बदलण्यात येणार आहे. शहराच्या मुख्य चौकांचे सुशोभीकरण होत असतानाच, आता प्रभागनिहाय अंतर्गत स्वच्छतेवरही भर दिला जाणार आहे. शहरात नगरपालिकेच्या माध्यमातून लवकरच डीप क्लीन (मुळापासून स्वच्छता) ही विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत नगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आणि वाहने एकाच वेळी एकाच प्रभागात उतरून तो प्रभाग चकाचक करणे आहेत. पालकमंत्री उदय सामंत यांची ही संकल्पना असून ती लवकरच प्रत्यक्षात आणली जाणार आहे.
शहरात सध्या स्मार्ट सिटीअंतर्गत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. मात्र, केवळ मुख्य रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण करून शहर सुंदर दिसत नाही, तर गल्लीबोळांतील स्वच्छताही तितकीच महत्त्वाची असते, ही बाब ओळखून उदय सामंत यांनी ही मोहीम आखली आहे. यात केवळ कचरा उचलणे एवढाच मर्यादित हेतू नसून, नालेसफाई, फूटपाथची दुरुस्ती, रंगरंगोटी आणि साचलेल्या राडारोड्याची विल्हेवाट लावणे या गोष्टींचा समावेश असेल. साधारणपणे स्वच्छता कर्मचारी वेगवेगळ्या प्रभागांत विभागलेले असतात, ज्यामुळे कामाचा वेग मर्यादित राहतो. मात्र, डीप क्लीन मोहिमेत पालिकेची संपूर्ण यंत्रणा एकाच प्रभागात केंद्रीत केली जाईल. यामुळे अवघ्या काही तासांत तो प्रभाग पूर्णपणे स्वच्छ होईल.
www.konkantoday.com



