रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणखी ६५० शाळांवर सीसीटीव्ही


शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जिल्हा नियोजन समितीकडून यासाठी तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या निधीतून जिल्ह्यातील आणखी ६५० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांना अधिक सुरक्षित शैक्षणिक वातावरण उपलब्ध होणार आहे.
बदलापूर येथील धक्कादायक घटनेनंतर राज्यभरात विद्यार्थ्यांच्या, विशेषतः विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यानंतर शासनाने शाळांमधील सुरक्षाविषयक उपाययोजना अधिक कठोर करण्याचे निर्देश दिले. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सर्व शाळांना सुरक्षा यंत्रणा सक्षम करण्याचे आदेश दिल्यानंतर सीसीटीव्ही कॅमेरे हा महत्त्वाचा आणि प्रभावी पर्याय म्हणून पुढे आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण २ हजार ३५२ प्राथमिक शाळा आहेत. या सर्व शाळांमध्ये टप्प्याटप्प्याने सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यापूर्वी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्या निधीतून जिल्ह्यातील ७०० शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आता नव्याने मंजूर झालेल्या ४ कोटी रुपयांच्या व निधीमुळे आणखी ६५० शाळा डिजिटल सुरक्षेच्या कक्षेत येणार आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button