लक्झरी बसच्या धडकेत उद्ध्वस्त झालेला सावर्डे बस थांबा वर्षभरापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; प्रवाशांचे हाल

सावर्डे (ता. चिपळूण) : मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डे येथील मुख्य बस थांबा गेल्या वर्षभरापासून दुरवस्थेत असून, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. वर्षभरापूर्वी भरधाव लक्झरी बसच्या धडकेत बस थांब्याचे मोठे नुकसान झाले होते. मात्र, अद्याप त्याची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

मुंबईहून येणाऱ्या लक्झरी बसने नियंत्रण गमावून दुभाजक ओलांडत विरुद्ध मार्गावरील बस थांब्याला जोरदार धडक दिली होती. या अपघातात बस थांब्याचे पिकअप शेड वाकले, पत्रे तुटली आणि शेजारील स्ट्रीट लाईटचा विद्युत पोलही कोसळला. सुदैवाने अपघात पहाटेच्या वेळी झाल्याने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

सध्या बस थांब्याचे लोखंडी खांब गंजले असून पत्रे फाटलेली आहेत. बसण्यासाठीचे बाक मोडकळीस आले असून परिसरात कचऱ्याचे साम्राज्य आहे. विद्युत पोलचा केवळ चौथरा आणि उघड्या लोखंडी सळ्या शिल्लक असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसापासून बचावासाठी स्थानिकांनी प्लास्टिक आणि फाटके कापड बांधून तात्पुरती व्यवस्था केली आहे.

सावर्डे हा मुंबई, पुणे, रत्नागिरीसह विविध मार्गांवरील एसटी व खासगी बसांचा महत्त्वाचा थांबा आहे. दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक या बसथांब्याचा वापर करतात. मात्र, मोडकळीस आलेल्या शेडमुळे विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने नवीन सुसज्ज बस थांबा उभारावा, स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button