
ऐन दिवाळीत तुकाराम मुंढेंच्या ‘एफडीए’चा दणका; झेप्टो, बिर्याणी बाय किलोसह १०५ प्रतिष्ठानांचे परवाने निलंबित!
Tukaram Mundhe FDA Action License Suspended Diwali Updates : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक तपासणी मोहीम हाती घेतली असून अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १०५ खाद्य व्यवसायांचे परवाने तात्काळ निलंबित केले आहेत.
एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये ‘झेप्टो’, ‘ब्लिंकिट’ यांसारखे लोकप्रिय क्विक-कॉमर्स प्लॅटफॉर्म तसेच ‘बिर्याणी बाय किलो’सारख्या नामांकित फूड ब्रॅण्ड्सचाही समावेश आहे. इंडिया टुडेने यासंबंधीचे सविस्तर वृत्त दिले आहे.
एफडीएने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी राज्यभरात ही विशेष तपासणी मोहीम राबवली. या कारवाईत एकट्या मुंबईतील २८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. यामध्ये झेप्टोचे वरळीतील आऊटलेट, ब्लिंक कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे चालवले जाणारे ब्लिंकिट, तसेच बिर्याणी बाय किलो, टॉसिन पिझ्झाचे वरळी आऊटलेट आणि जम्बो बर्गर यांसारख्या प्रमुख आस्थापनांचा समावेश आहे.
सात आस्थापने कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश
अन्नसुरक्षा मानकांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी प्रशासनाने राज्यभरातील सात आस्थापने पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पुण्यातील तीन, अमरावतीतील दोन, तर मुंबई आणि कोकण विभागातील प्रत्येकी एका आस्थापनेचा समावेश आहे. मुंबईतील बोरीवलीतील एका बिर्याणी सेंटरने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाच्या (FSSAI) नियमांचे उल्लंघन केल्याचे निष्पन्न झाल्याने ते तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले.
याशिवाय, नागपूरमधील कामठी रोडवरील एका ‘डी-मार्ट’ आऊटलेटवर परवान्यातील अटींचा भंग झाल्याचे आढळल्याने तेथील रिफाइंड सोयाबीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला.
१.३५ कोटींहून अधिक रुपयांचा अन्नसाठा जप्त
या मोहिमेदरम्यान एफडीएच्या पथकांनी ६९ हून अधिक प्रतिष्ठानांमधून तब्बल १ कोटी ३५ लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा अन्नसाठा जप्त केला. हा साठा आरोग्यास अपायकारक किंवा भेसळयुक्त असण्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधातील मोहिमेत तीन एफआयआर नोंदवण्यात आले असून दोघांना अटक करण्यात आली आहे, तसेच दोन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती समोर आली आहे.




