दिवाळीनिमित्त श्रीदेव भैरी मंदिर परिसरात रविवारी वाहतुकीत बदल; झाडगाव रस्ता सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत ‘एकदिशा’


*रत्नागिरी, दि. ७ : दीपावलीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील ग्रामदैवत श्रीदेव भैरी मंदिरामध्ये (खालची आळी) भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत महत्त्वाचे बदल केले आहेत. गर्दीमुळे वाहतूक कोंडी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी रविवार, दिनांक ८ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत तात्पुरत्या स्वरूपात ‘एकदिशा वाहतूक’ (One Way) लागू करण्यात आली आहे.
या संदर्भातील अधिसूचना प्रभारी पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३४ व मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम ११५, ११६ अन्वये जारी केली आहे.
*वाहतूक व्यवस्थेतील महत्त्वाचे बदल खालीलप्रमाणे*
एकदिशा मार्ग
झाडगाव एमएसईबी रोड ते श्रीदेव भैरी मंदिर (खालची आळी) मार्गे रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. ०८ च्या दिशेने जाणारा रस्ता हा ‘एकदिशा’ करण्यात आला आहे.
पर्यायी मार्ग
सदर एकदिशा मार्गासाठी वाहनचालकांसाठी मुरलीधर मंदिर – भुतेनाका ते नगरपरिषद शाळा क्र. ०८ हा पर्यायी मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
अत्यावश्यक सेवेतील वाहनांना सवलत
सदर अधिसूचना ही पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, शासकीय वाहने तसेच मा. मंत्री महोदयांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने पोलिसांनी परवानगी दिलेल्या वाहनांना लागू असणार नाही. याशिवाय, अत्यंत निकडीच्या व आणीबाणीच्या प्रसंगी घटनास्थळी तैनात असलेले पोलीस अधिकारी परिस्थितीनुसार निर्णय घेतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या वाहतूक नियंत्रण अधिसूचनेबाबत वाहन चालक, मालक किंवा नागरिकांना काही हरकती अथवा आक्षेप असल्यास त्यांनी ते पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे नोंदवावेत; पुढील अधिसूचना काढताना या आक्षेपांचा योग्य तो विचार केला जाईल, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भाविकांनी व शहरवासीयांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button