CJP च्या आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार? दिल्ली पोलिसांना नेमकी कसली प्रतीक्षा?

The decision regarding the withdrawal of cases will be issued in writing on Tuesday : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर कॉक्रोच जनता पार्टी आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याबाबत केंद्र सरकारच्या आदेशाची दिल्ली पोलिसांकडून प्रतीक्षा केली जात आहे.

सरकारकडून सूचना मिळाल्यानंतरच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली जाईल, असे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तर सीजेपीच्या प्रवक्त्याने सांगितले की, गुन्हे मागे घेण्यासंदर्भातील निर्णय मंगळवारी लेखी स्वरूपात देण्यात येणार आहे. याबद्दल सविस्तर वृत्त हिंदुस्थान टाइम्सने दिले आहे.

अधिकृत आदेशानंतरच पुढील कारवाई

“२० जुलै रोजी झालेल्या हिंसाचाराच्या संदर्भात आणि २२ जुलै रोजी दाखल करण्यात आलेल्या इतर प्रकरणांमध्ये पुढील कारवाई कशी करावी, याविषयी सरकारच्या अधिकृत सूचनेची आम्ही सध्या वाट पाहत आहोत”, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले

जेपी नड्डा यांची घोषणा

केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, सीजेपी सोबतच्या चर्चेत आंदोलनादरम्यान दाखल झालेले गुन्हे, बाधित कुटुंबांना मिळणारी नुकसानभरपाई आणि सीजेपीच्या मागण्यांचे व्यापक निवेदन या मुद्द्यांचा समावेश होता. “यापुढे कोणतीही कारवाई होणार नाही आणि आधीच दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जातील,” असेही त्यांनी म्हटले.

‘एफआयआर मागे घेणे’ म्हणजे नेमके काय?

दुसऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने स्पष्ट केले की, कायदेशीरदृष्ट्या एफआयआर मागे घेतली जात नाही. त्यांच्या मते, एफआयआरवर तीन प्रकारे कारवाई होऊ शकते. आरोपपत्र दाखल करून खटला चालवणे, तपासानंतर क्लोजर रिपोर्ट किंवा रद्द अहवाल सादर करणे आणि राज्य सरकारकडून खटला मागे घेण्याचा निर्णय घेणे. सरकारकडून खटला मागे घेण्याचा अधिकृत आदेश मिळाल्यास पुढील तपास केला जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

१५ एफआयआर दाखल, गंभीर कलमांचाही समावेश

दिल्ली पोलिसांनी २० ते २३ जुलैदरम्यान सीजेपीच्या चालो संसद मोर्चादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर एकूण १५ एफआयआर नोंदवल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, २० जुलैच्या संघर्षात १२९ सुरक्षा कर्मचारी आणि ६० हून अधिक आंदोलक जखमी झाले, तर त्यानंतरच्या संघर्षांमध्ये आणखी ११ पोलिस कर्मचारी जखमी झाले.

‘खुनाचा प्रयत्न’सह गंभीर आरोप

हिंदुस्तान टाइम्सच्या हाती लागलेल्या एफआयआरपैकी कर्तव्य पथ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एका एफआयआरमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) अंतर्गत खुनाचा प्रयत्न, दंगल, बेकायदेशीर जमाव, सरकारी कर्मचाऱ्यांवर हल्ला, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन यांसारखे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

तक्रारीनुसार, २० जुलै रोजी पहाटे ५ वाजल्यापासून संबंधित अधिकाऱ्याची कर्तव्य पथावरील ‘सी-हेक्सागॉन’ परिसरात नियुक्ती करण्यात आली होती. सकाळी साडेअकराच्या सुमारास, आंदोलक संसदेच्या दिशेने कूच करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ते आणि त्यांचे पथक रफी मार्गावरील रेल भवनजवळील बॅरिकेड्सकडे रवाना झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button