
मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात दरड कोसळली; आठ तासांपासून वाहतूक विस्कळीत
रत्नागिरी, दि. ६ : रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांच्या सीमेवरील मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात सोमवारी पहाटे सुमारे १.३० वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. हॉटेल अनुसयापासून सुमारे १०० मीटर अंतरावर ही दरड कोसळून मोठा माती व दगडांचा ढिगारा रस्त्यावर आल्याने दोन्ही दिशेतील वाहतूक ठप्प झाली.
घटनेनंतर प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले आहे. मात्र, दरड मोठ्या प्रमाणात कोसळल्यामुळे वाहतूक पूर्ववत करण्यास विलंब होत आहे. गेल्या आठ तासांपासून महामार्ग बंद असल्याने दोन्ही बाजूंना मालवाहू ट्रक, एसटी बस, खासगी वाहने आणि प्रवासी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाट परिसरात आणखी दरडी कोसळण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहनचालकांनी अत्यावश्यक नसल्यास प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून रस्ता वाहतुकीसाठी कधी खुला होणार याकडे प्रवासी आणि वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.




