
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा अंतर्गत मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी, रत्नागिरी शहर, मा. मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृती पंधरवडा निमित्त आयोजित ‘मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिर’ रविवार, दि. ५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.० ते दुपारी २.० या वेळेत भाजप जिल्हा कार्यालय, रत्नागिरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या आरोग्य शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सामान्य नागरिकांना त्यांच्या दारात दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामध्ये विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले.
यावेळी डॉ. अनुप करमरकर यांनी नागरिकांची रक्तदाब तपासणी, विविध सामान्य आरोग्य समस्यांचे निदान तसेच आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. अद्वैत देशपांडे यांनी दंत तपासणी करून दातांच्या विविध आजारांबाबत उपचार, प्रतिबंधात्मक उपाय आणि तोंडाच्या स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले. लुपिन इंडियाचे श्री. आदित्य कदम यांनी फुफ्फुसाच्या कार्यक्षमतेची PFT तपासणी करून नागरिकांना श्वसनविकारांविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. तसेच नेक्स्ट लाईफ लॅब यांच्या माध्यमातून आवश्यक रक्त तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिरामुळे अनेक नागरिकांना आपल्या आरोग्याची प्राथमिक तपासणी करून घेण्याची संधी मिळाली. तपासणीदरम्यान आवश्यक त्या व्यक्तींना पुढील उपचारांसाठी योग्य वैद्यकीय सल्लाही देण्यात आला. नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत करत अशा आरोग्यविषयक सेवा सातत्याने आयोजित करण्याची अपेक्षा व्यक्त केली. या प्रसंगी मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे जिल्हा समन्वयक श्री. राजेश आंबेकर, वैद्यकीय अधिकारी श्री. सुमित सावंत, आणि श्री. केदार ढेकणे उपस्थित होते. तसेच भारतीय जनता पक्षाचे जिल्हा व शहर पदाधिकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा, विविध आघाड्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील नागरिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आरोग्य तपासणीचा लाभ घेतला. भाजप रत्नागिरी शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. जिल्हा व शहर भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे संयोजक श्री. निलेश मराठे, सहसंयोजक श्री. संकेत कदम आणि सौ. सारिका शर्मा यांनी नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीची जबाबदारी प्रभावीपणे सांभाळत हा आरोग्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. समाजहिताला प्राधान्य देत नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, वेळेत तपासणीद्वारे गंभीर आजारांचे निदान व्हावे आणि आरोग्याबत जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने भारतीय जनता पक्षातर्फे राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाच्या विचारांना साजेसा हा उपक्रम ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.




