मुंबईतील मानखुर्दमध्ये घर कोसळून सहा जणांचा मृत्यू ; एक जखमी


मुसळधार पावसामुळे मुंबई शहरात मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडत असताना रविवारी रात्री मानखुर्दच्या जनतानगर परिसरात एक तीनमजली घर अचानक कोसळले. यामध्ये सहाजणांचा मृत्यू झाला असून चार ते पाचजण जखमी झाले आहेत.रात्री उशिरापर्यंत पालिका आणि अग्निशमन दलाकडून याठिकाणी बचावकार्य सुरू होते.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी अनेक ठिकाणी झाडे आणि जमीन खचल्याच्या घटना घडत आहेत. रविवारी अशाच प्रकारे मानखुर्दच्या जनतानगर परिसरातील चाळ क्रमांक ५ येथे रात्री नऊच्या सुमारास तीनमजली घर अचानक कोसळले. घटनेनंतर स्थानिकांनी तत्काळ याठिकाणी बचावकार्य सुरू करत पालिका आणि अग्निशमन दलाला याची माहिती दिली. त्यानुसार अग्निशमन दल आणि पालिकेने घटनास्थळी जाऊन बचावकार्य सुरू केले.मोठ्या दाटीवाटीने हा परिसर वसलेला असल्याने याठिकाणी बचावकार्य करण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना मोठ्या अडचणी येत होत्या. त्यातच पावसाचा जोरही मोठा होता. अग्निशमन दलाच्या जवानांनी याची पर्वा न करता काही वेळातच ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सातजणांना बाहेर काढले. यातील काहीजणांना गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात तर काहीजणांना घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच शताब्दी रुग्णालयात पाचजणांचा मृत्यू झाला; तर राजावाडी रुग्णालयात एकाचा मृत्यू झाला. मृतांमध्ये चार महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून रात्री उशिरापर्यंत याठिकाणी बचावकार्य सुरू होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button