
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर महायुतीचा गुलाल! प्रमोद कामत अध्यक्ष, तर दादा साईल उपाध्यक्षपदी बिनविरोध
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमध्ये भाजप शिवसेनेची सत्ता आली असून सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षपदी भाजपचे बांदा प्रभागातून निवडून आलेले प्रमोद कामत यांची अध्यक्षपदी तर जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी कुडाळ तालुक्यातील पावशी प्रभागातून विजयी झालेले तुकाराम उर्फ दादा साईल यांची बिनविरोध निवड जाहीर झाली.भाजप आणि शिवसेना महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांमध्ये चांगला समन्वय दाखवत दोन्ही पदांसाठीचा उमेदवारी अर्ज एकत्रितपणे सादर केला. मात्र सहा अपक्ष सदस्य आणि ठाकरे सेनेचे तीन सदस्य मिळून जो ९ सदस्यांचा दबावगट स्थापन करण्यात आला आहे त्यांनी मात्र उमेदवारी अर्ज दाखल करताना सहभागी न होता स्वतंत्र अस्तित्व दर्शविले. किंबहुना सभागृहात बसतानाही दबावगटातील नऊही सदस्य एकत्रित बसले होते.
भाजप-शिवसेनेचे मात्र ५० पैकी ४१ इतके मोते संख्याबळ आहे. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, दीपलक्ष्मी पडते, सुमेधा पाताडे यांच्यासह माजी सभापती संजय बोबडी, सावी लोके, संतोष साटविलकर, प्रीतेश राऊळ तसेच मनोज रावराणे, प्रमोद रावराणे, सुनील पारकर, प्राची इस्वलकर, शीतल दळवी, सुप्रिया वालावलकर, संतोष पारकर हे सत्ताधारी सदस्य तसेच स्वतंत्र गटातील रुपेश पावसकर, राजन चिके, संजय गावडे, सुजाता पडवळ, शिवानी नाईक, नितीन राऊळ असे सर्व सदस्य उपस्थित होते.




