रत्नागिरी शहरातील मांडवी परिसरात भटक्या गायीचा धुमाकूळ; चार महिन्यात ८ ते १० जण जखमी


रत्नागिरी शहरातील पर्यटकांनी कायम गजबजलेल्या मांडवी परिसरात एका भटक्या गायीच्या हल्ल्यांमुळे नागरिक आणि पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पांढर्‍या रंगाची व टोकदार शिंगांची ही गाय गेल्या तीन ते चार महिन्यांपासून अचानक रस्त्यावर येऊन लहान मुले, महिला, पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिकांवर हल्ले करीत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मांडवी परिसरातून जाणार्‍या नागरिकांच्या पाठीमागे लागून ही गाय अचानक धडक देत किंवा शिंगांनी हल्ला करीत आहे. गेल्या तीन-चार महिन्यांत सुमारे ८ ते १० जण या हल्ल्यांत जखमी झाले असून, काहींना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात उपचार घ्यावे लागले. काही दिवसांपूर्वी एका पर्यटकालाही या गायीच्या हल्ल्याचा फटका बसल्याची माहिती स्थानिकांनी दिली. या सततच्या घटनांमुळे मांडवी परिसरात पायी फिरणार्‍या नागरिकांसह पर्यटकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अचानक हल्ला होण्याच्या भीतीने अनेकजण सावधपणे वावरत आहेत. या गायीचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि न.प. प्रशासनाकडे केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास एखादी गंभीर दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button