रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेले मिशन जलद आणि रत्नसेतू ऍप प्रभावी


नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाने सुरू केलेले मिशन जलद आणि रत्नसेतू ऍप प्रभावी ठरत आहे. या उपक्रमामुळे हजारो नागरिकांना घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ मिळत असून, पोलीस दलाने प्राप्त झालेल्या सर्व अर्जाचा शंभर टक्के निपटारा करून कार्यक्षमतेचा आदर्श निर्माण केला आहे.
दि. १ मे २०२५ ते २६ जून २०२६ या कालावधीत रत्नसेतू ऍपद्वारे प्राप्त झालेल्या सर्व अर्जाचा निपटारा करण्यात ओला असून, एकही अर्ज प्रलंबित ठेवण्यात आलेला नाही. या कालावधीत खासगी व निमशासकीय नोकर्‍यांसाठी २२ हजार ३८४ नागरिकांनो चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे देण्यात आली. तसेच २ हजार ९१४ ध्वनिक्षेपक परवाने, १४० पोलीस क्लिअरन्स (पीसीसी) प्रमाणपत्रे, १३१ सभा व मिरवणुकींना परवानग्या, तसेच मोकळ्या जागेतील ३० आणि बंदिस्त सभागृहातील १९ सार्वजनिक कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली.
नागरिकांना अर्जाच्या सद्यस्थितीची माहिती सहज मिळावी आणि सेवांमध्ये कोणताही विलंब होऊ नये यासाठी प्रत्येक सेवेसाठी स्वतंत्र नोडल अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चारित्र्य पडताळणीसाठी विश्रुती कळंबटे, पासपोर्ट सेवेसाठी राजेंद्र फुटक, ड्रोन व ध्वनिक्षेपक परवान्यांसाठी रुकसार पटेल, सशुल्क बंदोबस्तासाठी निशा केळकर, तर मिशन जलदचे मुख्य नोडल अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक विशाल शिंदे यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी अधिकारी अश्वनाथ खेडकर तसेच सर्व पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करत आहेत. नागरिकांनी विविध पोलीस सेवांचा लाभ घेण्यासाठी रत्नसेतू ऍपचा वापर करावा तसेच अधिक माहितीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाशी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा पोलीस प्रशासनाने केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button