
पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर -सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे
पुढील चार वर्षांत भजनी कलाकारांसाठी अधिकाधिक योजना, मानधन, सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येईल. भजन सदन उभारणी, कलाकार मानधन वाढ, तसेच पंढरपूर येथे सिंधुदुर्गातील वारकऱ्यांसाठी वारकरी भवन उभारणार असल्याची घोषणा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केली.
कणकवली येथे आयोजित तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री नितेश राणे यांनी भजनी कलाकारांसाठी शासनाच्या माध्यमातून भरीव काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. भजनी कलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळाव, त्यांच्या प्रश्नांना शासनदरबारी न्याय मिळावा, या उद्देशाने कणकवली येथे आयोजित ‘तालुकास्तरीय पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचे’ उद्घाटन मंत्री राणे यांच्या हस्ते येथील भगवती मंगल कार्यालयात झाले.
भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक, नगरसेवक राकेश राणे, ह.भ.प. विश्वनाथ गवंडळकर महाराज, भजनी कलाकार समिती अध्यक्ष संतोष कानडे, उपाध्यक्ष प्रकाश पारकर, माजी सभापती बुलंद पटेल, सुरेश सावंत आदी उपस्थित होते. पालकमंत्री नीतेश राणे म्हणाले, राज्याचे सांस्कृतिक मंत्री आपल्या कोकणातीलच आहेत. तसेच मंत्रिमंडळात माझ्या शब्दाला वजन असल्याने, पुढील चार वर्षांच्या काळात भजनी कलाकारांसाठी जास्तीत जास्त योजना आणि सोयी-सुविधा महायुती सरकारकडून मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.




