महाराष्ट्रात अल्पसंख्यांक कोट्यात किती प्रवेश? आरोग्य विद्यापीठाची छाननी!

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संलग्न राज्यातील अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त शिक्षण संस्थांमार्फत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात किती प्रमाणात प्रवेश दिला जातो, याची छाननी सुरू करण्यात आली आहे.

धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांकडे मागील तीन शैक्षणिक वर्षांतील अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची माहिती मागविण्यात आली आहे.

धार्मिक अथवा भाषिक अल्पसंख्यांकांना शैक्षणिक संस्था स्थापन करून त्यांचे प्रशासन करण्याचा घटनात्मक अधिकार आहे. या अधिकाराचा मूलभूत हेतू संबंधित अल्पसंख्यांक समुदायाच्या शैक्षणिक हितांचे संरक्षण व संवर्धन करणे हा आहे. तथापि, अशा संस्थांनी प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व गुणवत्ताधिष्ठित ठेवून संबंधित सक्षम प्रवेश प्राधिकरण, महाराष्ट्र शासन आणि विद्यापीठाने विहित केलेल्या पात्रता, प्रवेश क्षमता, कोटा, मंजुरी आणि शैक्षणिक मानकांचे संपूर्ण पालन करणे आवश्यक असल्याकडे विद्यापीठाने लक्ष वेधले आहे.

शासन निर्णयानुसार उच्च, तांत्रिक अथवा व्यावसायिक शैक्षणिक संस्थांच्या प्रवेशासंबंधी विविध अटी आहेत. विद्यापीठाकडे नवीन महाविद्यालय सुरू करणे, प्रवेश क्षमता वाढविणे अथवा बृहत् आराखड्याशी संबंधित सवलतीसाठी प्रस्ताव प्राप्त होतात. या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी अल्पसंख्यांक दर्जाप्राप्त संस्थांनी मागील तीन वर्षांत अल्पसंख्यांक समुदायातील किती विद्यार्थ्यांना प्रवेश दिला, याची माहिती विद्यापीठाकडे असणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रवेश कोट्याचे बंधन कसे ?

शैक्षणिक वर्ष २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ या वर्षांतील प्रवेशाची अभ्यासक्रमनिहाय माहिती सादर करावी, असे आरोग्य विद्यापीठाने संबंधित शैक्षणिक संस्थांना सूचित केले आहे. अनुदानित धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्यांक शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या मंजूर प्रवेश क्षमतेपैकी किमान ५० टक्के जागांवर संबंधित अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा. तर विनाअनुदानित अशा संस्थांनी किमान ५१ टक्के प्रवेश संबंधित अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांना द्यावा, असे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवेश प्रक्रिया सामाईक प्रवेश चाचणी अथवा गुणवत्तेच्या आधारे पारदर्शक पद्धतीने राबविणे आवश्यक राहील. संस्थेच्या संकेतस्थळावर अल्पसंख्यांकांसाठी राखीव जागा, अर्ज केलेल्या व प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांची यादी, तसेच अल्पसंख्यांक व बिगरअल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा तपशील उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे.

कमी प्रवेश झाल्यास…

अल्पसंख्यांक कोट्यात आवश्यक विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास त्या जागा बिगरअल्पसंख्यांक उमेदवारांमधून भरताना अल्पसंख्यांक विकास आयोगाची पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. सलग तीन शैक्षणिक वर्षांत अल्पसंख्यांक कोट्यात उपलब्ध ५० अथवा ५१ टक्के जागांच्या तुलनेत अल्प प्रमाणात संबंधित विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित संस्थेचा अल्पसंख्यांक दर्जा रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असा दाखला आरोग्य विद्यापीठाने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button