साताऱ्यात गणेश आगमन मिरवणुकीत आगीचा भडका; ‘सह्याद्रीच्या राजा’चा डायनासॉर जळून खाक


गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत फटाक्यांच्या आतषबाजीमुळे ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या हलत्या डायनासॉर देखाव्याला अचानक आग लागल्याची घटना बुधवारी रात्री साताऱ्यामधील राजवाडा बस थांबा परिसरात घडली. आगीमुळे काही काळ भाविकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झालेली नाही.

साताऱ्यात बुधवारी रात्री विविध प्रमुख गणेशोत्सव मंडळांच्या आगमन मिरवणुका मोठ्या उत्साहात काढण्यात आल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात, ढोल-ताशांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. आझाद हिंद मंडळ, समता पार्क, नर्मदेश्वर, शिवतेज आणि ‘सह्याद्रीचा राजा’ या प्रमुख मंडळांच्या मिरवणुकांमुळे राजवाडा परिसरात मोठी गर्दी झाली होती.

दरम्यान, ‘सह्याद्रीचा राजा’ मंडळाच्या मिरवणुकीतील आकर्षक हलत्या डायनासॉर देखाव्याजवळ फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने भीषण स्वरूप धारण केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला. डायनासॉरचा देखावा आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने तो मोठ्या प्रमाणात जळून खाक झाला.

घटनेची माहिती मिळताच मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तातडीने धाव घेत आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. संभाव्य मोठा धोका टाळण्यासाठी गणेशमूर्ती, जनरेटर तसेच महागडी ध्वनियंत्रणा सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आली. कार्यकर्त्यांनी पाण्याच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला.

पोलिसांनी तत्काळ बघ्यांची गर्दी हटवून परिस्थिती नियंत्रणात आणली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.

दरम्यान, यंदाच्या गणेशोत्सवातील मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणावर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button