
समृद्धी महामार्गावर साडेतीन वर्षांत ५७२ जणांचा मृत्यू! आणखी किती जणांचे बळी जाणार?
128 people killed in eight months : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा सापळाच बनत चालला आहे. शुक्रवारी पहाटे शेगाव येथून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्धेकडे जाणाऱ्या वाहनाला धामणगाव नजीक ट्रकने मागून धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सात जणांना प्राण गमवावे लागले.
या अपघाताने पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील वाढत्या अपघातांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गेल्या साडेतीन वर्षांत या महामार्गावर ६३३ अपघातांमध्ये ५७२ जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
आठ महिन्यांत १२८ जणांचे बळी
समृद्धी महामार्गावर डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत एकूण ४९१ अपघात घडले होते. त्यात ४४४ जणांचा मृत्यू झाला होता. तर जानेवारी ते ऑगस्ट २०२६ या आठ महिन्यांमध्ये समृद्धी महामार्गावर १४२ अपघातांमध्ये १२८ जणांना प्राण गमवावे लागले. माहिती अधिकारातून ही आकडेवारी समोर आली आहे. गेल्या जूनमध्ये धामणगाव रेल्वेजवळील चॅनेल क्रमांक १०५ च्या परिसरात रस्त्यावर उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव कार धडकून एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे घडलेला अपघात हा चॅनेल क्रमांक ९७ येथे घडला.
प्रवासाचा वेळ वाचतो पण…
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाला लागणारा वेळ कमालीचा कमी झाला आहे. मात्र, वाढते अपघात हा चिंतेचा विषय बनला आहे. यावर अभ्यासही करण्यात आले आहेत. त्यातून ‘महामार्ग संमोहन’ हेही एक कारण असल्याचे सांगण्यात आले. कोणत्याही अडथळ्याविना महामार्गावर वाहन सरळ एकाच दिशेने धावत असते, तेव्हा चालकाच्या शरिराची हालचाल स्थिर होते, चालकाचा मेंदू प्रतिक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्याला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात. विशेष म्हणजे या महामार्गावर बहुतांश अपघात हे रात्रीच्या वेळी घडले आहेत.
कोणत्या कारणांमुळे अपघात होताहेत?
‘महामार्ग संमोहन’ हे ३३ टक्के अपघातांसाठी कारणीभूत असल्याचे अभ्यासातून सांगण्यात आले आहे. ‘लेन कटिंग’ हे देखील एक मुख्य कारण आहे. आपली लेन सोडून दुसऱ्या लेनवर जाताना योग्य ती काळजी घेत नियमांचे पालन करायला हवे. तसे न केल्यास लेने बदलणारी व्यक्ती दुसऱ्या लेनवर जाते, तेव्हा त्या लेनवरील मागून येणाऱ्या वाहनांच्या चालकांना त्याचा अंदाज येत नाही. या कारणामुळे अपघात होतात. ५१ टक्के ट्रकचालक लेन ओलांडण्याचे नियम पाळत नाहीत, असे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.




