कुर्णेच्या आराध्या खामकरची राज्यस्तरीय बाल संसदेत दुहेरी भरारी

बाल उपमुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री पदाची मिळवली संधी

लांजा : रत्नागिरी जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधील ८४२ ग्रामपंचायतींमधून राज्यस्तरीय बाल संसदेसाठी निवड झालेल्या केवळ तीन ग्रामपंचायतींपैकी लांजा तालुक्यातील कुर्णे ग्रामपंचायतीने मान पटकावला आहे. विशेष म्हणजे, कुर्णे ग्रामपंचायतीची बालसरपंच म्हणून निवड झालेल्या आराध्या अमर खामकर हिने आपल्या नेतृत्वगुणांची छाप पाडत राज्यस्तरीय बाल संसदेत बाल उपमुख्यमंत्री आणि पर्यावरणमंत्री अशा दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी मिळवली आहे. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे कुर्णे गावासह संपूर्ण लांजा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग, यशदा आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक बालदिनाचे औचित्य साधून पुणे येथे राज्यस्तरीय बाल संसदेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यांमधील बालप्रतिनिधींना सहभागी होण्याची संधी देण्यात आली. त्यामध्ये कुर्णे ग्रामपंचायतीची निवड होणे हीच गावासाठी अभिमानाची बाब ठरली.
या बाल संसदेत आराध्या खामकर हिची कोकण विभागाच्या बाल उपमुख्यमंत्रीपदी तसेच पर्यावरणमंत्रीपदी निवड करण्यात आली. बालवयातच मिळालेली ही दुहेरी जबाबदारी तिच्या नेतृत्वक्षमतेची, आत्मविश्वासाची आणि गुणवत्तेची पावती मानली जात आहे. बालकांचे प्रश्न, त्यांचे हक्क, पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक जबाबदारी यांसारख्या विषयांमध्ये बालप्रतिनिधींना नेतृत्वाची संधी देणे हा या उपक्रमामागील महत्त्वपूर्ण उद्देश आहे.
या कार्यक्रमाला महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून बालप्रतिनिधींचे कौतुक केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्र्यांनी दृकश्राव्य माध्यमातून बालप्रतिनिधींना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष ॲड. संजय पुराणिक, आयोगाचे सदस्य प्रवीण भुजाडे (अमरावती), विविध जिल्ह्यांतील आयोगाचे सदस्य तसेच यशदा आणि युनिसेफचे अधिकारी उपस्थित होते.
आराध्याच्या या यशामागे कुर्णे ग्रामपंचायतीचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले. ग्रामपंचायत अधिकारी सौ. अनुष्का पडवळ, सरपंच सौ. मानसी माने, ग्रामपंचायत सदस्या तथा आराध्याची आई सौ. आकांक्षा खामकर, उपसरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे तिला मोलाचे मार्गदर्शन लाभले.
एका छोट्याशा गावातील मुलीने राज्यस्तरीय व्यासपीठावर पोहोचत दोन महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी स्वीकारणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. आराध्याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील मुलींनाही योग्य संधी, प्रोत्साहन आणि मार्गदर्शन मिळाल्यास त्या मोठी झेप घेऊ शकतात, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. तिच्या या यशाचे कुर्णे ग्रामस्थ, लांजा तालुक्यातील नागरिक आणि सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button