
ग्रामसभेच्या ठरावाची आरोग्य विभागाकडून तातडीने दखल
मुरडे रामवाडीत मोफत आरोग्य तपासणीला उत्स्फूर्त प्रतिसाद
खेड : मुरडे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्यांबाबत केलेल्या ठरावाची आरोग्य विभागाने तातडीने दखल घेतली आहे. ग्रामपंचायत हद्दीतील प्रत्येक वॉर्डात एक दिवस मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
या उपक्रमाची सुरुवात मुरडे रामवाडी येथून झाली. आरोग्य सेवक, सेविका आणि आशा वर्कर्स यांच्या पथकाने नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत शासकीय औषधोपचार उपलब्ध करून दिले. शिबिराला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
नियोजनानुसार मंगळवारी शिंदेवाडी (वॉर्ड क्र. २), तर बुधवारी गोठलवाडी (वॉर्ड क्र. ३) येथे आरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. ग्रामीण नागरिकांना खेड येथे ये-जा करण्याचा खर्च व वेळ वाचून स्थानिक पातळीवर आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याने या उपक्रमाचे स्वागत होत आहे.
यावेळी आरोग्य सेवक शंकर पार्टे, मदतनीस शिल्पा दळवी, आशा वर्कर्स दिव्या शिबे, रुपाली शिगवण व दर्शना निवळकर यांनी आरोग्य तपासणी व औषधोपचाराची जबाबदारी पार पाडली. विद्यमान तंटामुक्त अध्यक्ष दिगंबर दळवी, माजी सरपंच दशरथ खामकर, रवींद्र रेवाळे, मनोहरजी शिबे तसेच माजी उपसरपंच निधी शिगवण यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.




