
गावातील शाळांना कुलूप; शिक्षण कुठे?
खेड तालुक्यात ८ जिल्हा परिषद शाळा बंद; घटती पटसंख्या, स्थलांतर आणि इंग्रजी माध्यमाचा वाढता प्रभाव
खेड : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा आधार असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांवरच आता बंद होण्याची वेळ आली आहे. विद्यार्थीसंख्या घटल्याने खेड तालुक्यातील ८ प्राथमिक शाळांचे कामकाज बंद करण्यात आले असून, या शाळांतील विद्यार्थ्यांना लगतच्या शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मराठी शाळांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पटसंख्या पाचपेक्षा कमी झालेल्या किंवा एकही विद्यार्थी शिल्लक नसलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले. यामध्ये निगडे- कदमवाडी, तुळशी- घाणेकरवाडी, सापिर्ली- मराठवाडी, आंबवली- धनगरवाडी, धामणंद-बौद्धवाडी, खोपी-गुरववाडी आणि कुंभाड-गवळीवाडी या शाळांचा समावेश आहे.
रोजगारासाठी मुंबई, ठाणे, पुणे आदी शहरांकडे होणारे ग्रामीण भागातील स्थलांतर, तसेच पालकांचा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढता कल, यामुळे गावांतील शाळांची पटसंख्या झपाट्याने कमी होत आहे. दुर्गम वाड्यांमधील शाळांमध्ये तर विद्यार्थ्यांची संख्या अत्यल्प झाली आहे.
बंद झालेल्या शाळांतील मोजक्या विद्यार्थ्यांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरील शाळांमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. शिक्षकांचेही रिक्त पदे असलेल्या शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे.
गावातील शाळा बंद होणे ही केवळ पटसंख्येची बाब नसून ग्रामीण शिक्षणव्यवस्थे समोरील गंभीर आव्हान आहे. शासन विविध शैक्षणिक योजना राबवत असताना जिल्हा परिषद मराठी शाळांमध्ये विद्यार्थी टिकवून ठेवण्यासाठी पायाभूत सुविधा, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधुनिक शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्याची गरज आहे. अन्यथा एकेक करून गावातील शाळांच्या इमारती उभ्या राहतील आणि वर्गखोल्यांमध्ये मात्र विद्यार्थ्यांऐवजी शांतता दिसेल.




