
रत्नागिरी शहरात हायड्रोफोनिक गांजासह तिघे जेरबंद; रिक्षा आणि दुचाकी जप्त
रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी मोठी कारवाई करत अमली पदार्थ विक्री करणार्या तीन जणांना रंगेहात अटक केली आहे. १० ऑक्टोबर २०२६ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास महिला रुग्णालय ते चंपक मैदान जाणार्या सार्वजनिक रस्त्यावरील परिसरात पोलीस गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली.
आरोपी साहिल समीर सोलकर (रा. कोकण नगर), सुफियान अनिस गुहागरकर (रा. आझाद नगर) आणि यशराज राजेश देसाई (रा. हातखंबा) हे तिघे जण हिरव्या-काळ्या रंगाचा उग्र वासाचा पाला, फुले, काड्या आणि बोंडे असलेला वनस्पतीजन्य हायड्रोफोनिक गांजा हा अंमली पदार्थ विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीरपणे स्वतःजवळ बाळगून असल्याचे निदर्शनास आले.
या कारवाईत पोलिसांनी एकूण चार लाख वीस हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे ३४.५ ग्रॅम वजनाचा १ लाख २० हजार ७५० रुपये किमतीचा हायड्रोफोनिक गांजा, १ लाख ७५ हजार रुपये किमतीची एक काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा आणि १ लाख २५ हजार रुपये किमतीची पांढर्या रंगाची दुचाकी यांचा समावेश आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.



