
बहिणीची बाजू घेतल्याने भावाला मारहाण
बहिणीच्या बाजूने बोलल्याचा राग मनात धरून सख्ख्या भावानेच मोठ्या भावाला मारहाण केल्याची घटना तालुक्यातील कादवड येथे घडली. यात संतोष बाबा वरक (४८) हे जखमी झाले असून त्यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रमेश बाबा वरक (३०, दोघे-कादवड धनगरवाडी) याच्याविरोधात अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रमेश वरक हा खेड येथून आपल्या दोन मुलांसह देवदर्शनासाठी घरी आला होता. त्यानंतर खोपी-शिरगाव येथे राहणारी त्यांची बहीण विमल सचिन झोरे हीदेखील सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरी आली.
त्यावेळी रमेश वरक याने विमल झोरे यांना घरी येण्यास विरोध केला. यावर संतोष वरक यांनी हे घर तिच्याही वडिलांचे आहे. ती येथे येणारच असे बोलले असता बहिणीच्या बाजूने बोलल्याचा राग मनात धरुन रमेश याने घरात असलेला लाकडी दांडक्याने संतोष यांना मारहाण केली. या घटनेत यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. याप्रकरणी संतोष वरक यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार रमेश वरक याच्यावर अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




