
मुंबई–सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेसला मंजुरी; खेडसह कोकणातील प्रवाशांना दिलासा
खेड : कोकणातील रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी असून भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सुरू करण्यास मंजुरी दिली आहे. या नव्या सेवेमुळे मुंबई, ठाणे, पनवेल, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांना थेट रेल्वे संपर्क उपलब्ध होणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक १५०८७ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–सावंतवाडी रोड एक्स्प्रेस आणि गाडी क्रमांक १५०८८ सावंतवाडी रोड–छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाड्या दररोज धावणार आहेत.
या एक्स्प्रेसला दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावरदा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
या नव्या सेवेच्या माध्यमातून मुंबई महानगर प्रदेश आणि दक्षिण कोकण यांतील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. पर्यटन, शिक्षण, रोजगार, उद्योग-व्यवसाय तसेच सामाजिक कारणांसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा लाभ होणार असून कोकणातील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठीही हा प्रवास अधिक सोयीस्कर ठरणार आहे.
प्रवासी सुविधा वाढविणे, रेल्वे संपर्क अधिक सक्षम करणे आणि प्रादेशिक विकासाला चालना देणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. संबंधित गाडीचे वेळापत्रक आणि प्रत्यक्ष धावण्याची तारीख रेल्वेकडून स्वतंत्रपणे जाहीर केली जाणार आहे.




