
महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल; विजयाचा विश्वास व्यक्त
रत्नागिरी : आगामी विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी आज वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे आयोजित सभेला राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत उपस्थित होते. त्यांनी अनिकेत तटकरे यांना शुभेच्छा देताना महायुतीतील सर्व घटक पक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर ते मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला.
या कार्यक्रमाला खासदार सुनील तटकरे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, निरंजन डावखरे, प्रमोद जठार, प्रशांत ठाकूर, महेंद्र थोरवे यांच्यासह विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीच्या शक्तिप्रदर्शनामुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असल्याचे चित्र यानिमित्ताने पाहायला मिळाले.




