साखरीनाटे डोंगर जेटीचे आमदार किरण सामंत यांच्या हस्ते उद्घाटन


मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमचा आमदार म्हणून मी कटिबद्ध – आमदार किरण सामंत


*साखरीनाटे : राजापूर तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या डोंगर जेटीचे उद्घाटन लांजा-राजापूर-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. या जेटीमुळे परिसरातील मच्छीमार बांधवांना मासेमारीसाठी ये-जा करताना तसेच नौका सुरक्षितपणे उभी करण्यासाठी मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे.

साखरीनाटे परिसरातील मच्छीमार बांधवांच्या दैनंदिन अडचणी, जेटीशी संबंधित समस्या तसेच मासेमारी व्यवसायासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सुविधांचा प्रश्न गेल्या काही काळापासून चर्चेत होता. या पार्श्वभूमीवर डोंगर जेटीची सुविधा उपलब्ध झाल्याने स्थानिक मच्छीमारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “मच्छीमार बांधवांच्या अडचणी आणि त्यांच्या प्रश्नांची मला पूर्ण जाणीव आहे. तुमचा आमदार म्हणून मच्छीमार बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. त्यांच्या व्यवसायाला आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”

कोकणातील मच्छीमार हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणे गरजेचे आहे. जेटी, संरक्षक भिंती, रस्ते, वीज, पाणी तसेच इतर आवश्यक सुविधांच्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही आमदार सामंत यांनी स्पष्ट केले.

मच्छीमार बांधवांच्या सुख-दुःखात सदैव सोबत राहून त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी मदतीसाठी पुढे राहू, अशी ग्वाहीही आमदार किरण सामंत यांनी यावेळी दिली.

डोंगर जेटी सुरू झाल्याने साखरीनाटे परिसरातील मच्छीमारांच्या मासेमारी व्यवसायाला अधिक सुरक्षितता आणि सुविधा मिळणार असून, या कामासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार किरण सामंत यांचे मच्छीमार बांधवांनी आभार मानले.

उद्घाटन कार्यक्रमास सभापती नंदनी कदम, रवींद्र नागरेकर, आशपाक हाजू, दीपक नागले, अमजद बोरकर, शफी वाडकर, पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ,अजगर बांगी ,अल्ताफ बोरकर, सुलतान मोहळकर, मनोज आडवीळकर,विनोद शेलार, आतिफ हातवळकर, हसन हुसेन, आदिल मस्कर यांच्या सहित मच्छीमाल बांधव महिलावर्ग पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेमच्छीमार बांधव, स्थानिक ग्रामस्थ, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button