काळबादेवी व जांभरूण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते श्री.विनायक राऊत यांच्या उपस्थितीत सौर पथ दिव्यांचे उत्साहात लोकार्पण; उद्यावर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण!

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व प्रबोधन युवा प्रेरणा मंच यांच्यावतीने काळबादेवी आणि जांभरूण येथील नागरिकांसाठी सौर पथ दिव्यांचे (स्ट्रिट लाईट्स) लोकार्पण करण्यात आले असून यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे. काळबादेवी येथील पाथरदेव बस स्टॉप व दत्त मंदिर परिसर आणि जांभरूण येथील चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष सोहळ्यांमध्ये या सौर पथ दिव्यांचे मोठ्या उत्साहात लोकार्पण करण्यात आले.

या दोन्ही लोकार्पण सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, सचिव व माजी खासदार श्री. विनायकजी राऊत साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. त्यांच्या हस्ते या सौर पथ दिव्यांचे उद्घाटन करून हे दिवे जनतेसाठी समर्पित करण्यात आले. विशेषतः उद्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे सौर पथ दिवे कार्यान्वित झाल्यामुळे दोन्ही गावांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
बाप्पाच्या उत्सवासाठी मुंबई-पुण्याहून मोठ्या संख्येने गावाकडे येणाऱ्या लाडक्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी आणि स्थानिक ग्रामस्थांसाठी हे पथदिवे अत्यंत गरजेचे होते. रस्त्यावरील अंधार दूर होऊन हा सर्व परिसर प्रकाशमान झाल्यामुळे गावात येणाऱ्या चाकरमान्यांनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.हे दोन्ही सोहळे अत्यंत दिमाखदार वातावरणात संपन्न झाले.
या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ताजी कदम, तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील, तालुका समन्वयक शेखर घोसाळे, उप तालुकाप्रमुख विजय देसाई, शहर प्रमुख प्रशांत साळुंखे आणि उपशहर प्रमुख सलील डाफळे उपस्थित होते. तसेच युवासेना जिल्हाप्रमुख प्रसाद सावंत, ज्येष्ठ शिवसैनिक बंड्या पेटकर यांच्यासह महिला कार्यकारिणीमधील सौ. रशीदा गोदड, सौ. ममता जोशी, सौ. सेजल बोराटे, सौ. आस्था धांगडे, सौ. मेधा कोल्हटकर तसेच ओंकार वायंगणकर, नितीन तळेकर प्रामुख्याने उपस्थित होते. या परिसरातील शिवसैनिक आणि ग्रामस्थांनीही या सोहळ्याला मोठी गर्दी केली होती.
हा लोकोपयोगी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही गावातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले. काळबादेवी येथील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवती सेना विभाग अधिकारी सौ. दिव्या सुर्वे, काळबादेवी शाखाप्रमुख अजिंक्य सुर्वे, कु. रणजीत मालगुंडकर आणि कु. निमिष मयेकर यांनी विशेष मेहनत घेतली. तर जांभरूण गावातील सोहळा यशस्वी करण्यामागे महिला विभाग प्रमुख कु. साक्षी साळुंखे, शाखाप्रमुख विनोद साळुंखे, सुभाष चव्हाण, अनंत चव्हाण, मुकुंद साळुंखे व दिनकर पवार यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्सवाच्या तोंडावर केलेल्या या कामाबद्दल चाकरमान्यांनी आणि ग्रामस्थांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मनापासून आभार मानले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button