हातिवले येथे रस्त्याच्या बाजूच्या मोरीवर आदळल्याने टेम्पो ट्रॅव्हल्सचा अपघात; ७ ते ८ प्रवासी जखमी


गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या वाहनाची मोरीवर धडक; जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश


राजापूर : गणेशोत्सवासाठी मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने कोकणात निघालेल्या चाकरमान्यांच्या टेम्पो ट्रॅव्हल्सला रविवारी सकाळी मुंबई-गोवा महामार्गावर हातिवले येथे अपघात झाला. हॉटेल शिवानंदसमोर घडलेल्या या अपघातात वाहनातील सुमारे ७ ते ८ प्रवासी जखमी झाले असून, जखमींमध्ये काही लहान मुलांचाही समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सिंधुदुर्गच्या दिशेने जाणारी टेम्पो ट्रॅव्हल्स हातिवले येथे आली असता रस्त्याच्या कडेला असलेल्या मोरीवर आदळली. त्यानंतर वाहनावरील नियंत्रण सुटून ते डिव्हायडरवर जाऊन धडकले. या धडकेत वाहनातील प्रवासी जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्यासह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिका तसेच खासगी वाहनांच्या मदतीने तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ वाढली आहे. कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या वाढत असल्याने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि सुरक्षित अंतर राखून काळजीपूर्वक वाहन चालवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button