
सुरक्षित व सुरळीत गणेशोत्सवासाठी लोटे एमआयडीसी येथे पोलीस अधीक्षकांनी साधला उद्योग व वाहतूक संघटनांशी संवाद


खेड : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरातील उद्योग, वाहतूक व्यवस्था तसेच कामगार व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी लोटे एमआयडीसीतील उद्योग भवन येथे ११ सप्टेंबर रोजी पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड उपविभाग शैलेश सणस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, लोटे पोलीस दूरक्षेत्र प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. बेलदार, खेड व चिपळूण येथील वाहतूक संघटनांचे प्रतिनिधी, तसेच उद्योग भवनचे अध्यक्ष राज आंबे आणि लोटे एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी लोटे एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी व कामगारांना गणेशोत्सवाच्या कालावधीत येणाऱ्या संभाव्य अडचणी, वाहतूक समस्या तसेच सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न जाणून घेतले. उद्योग प्रतिनिधींनी मांडलेल्या विविध प्रश्नांवर आवश्यक उपाययोजना, पोलीस बंदोबस्त आणि परस्पर समन्वयाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.
गणेशोत्सवाच्या कालावधीत रत्नागिरी जिल्ह्यामधून मोठ्या प्रमाणात होणारी वाहनांची वाढती वर्दळ लक्षात घेता वाहतूक नियोजनाला विशेष महत्त्व देण्यात आले. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी व चाकरमानी तसेच गणेश भक्तांचा प्रवास सुरळीत राहण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत वाहनांना अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती उपस्थितांना देण्यात आली. तसेच, गणेशोत्सवाच्या कालावधीत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर लागू असलेल्या निर्बंधांची माहिती वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींना देण्यात आली. या निर्बंधांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी वाहतूक संघटनांनी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. बगाटे यांनी केले.




