
कामाच्या बहाण्याने १४ वर्षीय मुलीवर अत्याचार; पोस्टमनवर ‘पोक्सो’ अंतर्गत गुन्हा दाखल
खेड : पोस्ट ऑफिसमधील कामाच्या निमित्ताने एका कुटुंबाशी ओळख निर्माण झालेल्या ५६ वर्षीय इसमाने आरडीच्या पावत्या लिहिणे, आधार कार्ड तसेच इतर कागदपत्रांच्या कामाचे आमिष दाखवत १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला आपल्या घरी बोलावून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी पीडित मुलगी गरोदर राहिल्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आला असून खेड पोलिसांनी आरोपी नरेश बाबाजी मोरे (वय ५६, ता. खेड,) याच्याविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्यासह संबंधित कलमांन्वये गंभीर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडे दाखल झालेल्या तक्रारीनुसार, पीडित मुलगी इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत आहे. तिचे वडील नोकरीनिमित्त बाहेरगावी राहत असल्याने आरोपीचे त्यांच्या कुटुंबाशी येणे-जाणे होते. पोस्ट ऑफिसमधील आरडीच्या पावत्या लिहिणे, हप्ते भरणे तसेच आधार कार्ड आणि इतर शासकीय कागदपत्रांच्या कामासाठी मुलीची मदत लागेल, असे सांगून आरोपीने तिच्या वडिलांशी संपर्क साधला. त्यानंतर कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत मुलीला अनेकदा आपल्या घरी बोलावून घेतल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, एप्रिल २०२५ पासून जुलै २०२६ या कालावधीत मुलगी आरोपीच्या घरी गेल्यानंतर लिखाणाचे काम संपल्यानंतर तिच्यावर वारंवार जबरदस्तीने लैंगिक अत्याचार करण्यात आले. जून २०२५ आणि मे २०२६ मध्येही गावात वास्तव्यास असताना विविध कारणांनी मुलगी आरोपीच्या घरी गेली असता तिच्यावर पुन्हा अत्याचार झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.



